मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

By सीमा महांगडे | Published: May 27, 2024 07:15 AM2024-05-27T07:15:10+5:302024-05-27T07:16:33+5:30

सर्व मतदारसंघात मतदानात १ ते ५ टक्क्यांची ही घट दिसून आली आहे

Mumbai North Lok Sabha Constituency: Confusion due to low turnout, what exactly will happen? | मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उत्तर मुंबईत यंदा सुमारे ३ टक्के मते घटली आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच क्षेत्रात महायुतीचे आमदार असून या सर्व मतदारसंघात मतदानात १ ते ५ टक्क्यांची ही घट दिसून आली आहे. या स्थितीला आयोगाचा गोंधळ कारणीभूत आहे की मतदारांचा निरुत्साह हे सांगणे कठीण असले तरी यामुळे एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. या ठिकाणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे.

बोरिवली ते मालाड असा पसरलेला उत्तर मुंबई हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र असल्याने येथील लढत लक्षवेधी ठरली आहे. मुंबई उत्तरमधील बोरिवली विधानसभा मतदारसंघात मुंबईतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे ६२.५० टक्के मतदान झाले आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत हे मतदान ३ टक्क्यांनी कमी आहे. बोरिवलीमध्ये भाजपचे आमदार सुनील राणे यांनी आपली यंत्रणा कामाला लावूनही मतदानात ३ टक्क्यांची घट दिसून आली. दहीसरमध्ये मतदानाच्या दिवशी दिसून आलेली भली मोठी रांग मतदारांचा उत्साह दाखवत होती. मात्र त्यातील अनेक मतदार निराश होऊन परतल्याने यंदा दहीसर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या तुलनेत ४ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे.

दहीसरच्या भाजपच्या आमदार मनीषा चौधरी या आहेत. येथे असणारा उत्तर भारतीय व गुजराती  मतदार हा भाजपच्या बाजूने दिसून येतो. मात्र, मतदानाच्या दिवशी गोंधळ झाल्याने टक्केवारी घसरल्याची चर्चा आहे. 
मागाठाण्यात मराठी टक्का अधिक असून २०१९ मध्ये येथे ५७.७१ टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा हे २ टक्क्यांनी कमी झाले आहे. मागाठाणे येथे शिंदेसेनेचे प्रकाश सुर्वे हे आमदार असून शिंदेसेना आणि उद्धवसेनेमुळे येथील मराठी मतदार विभागला गेल्याने मराठी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची शक्यता वर्तवली जाते. चारकोप मतदारसंघात भाजपचे आ. योगेश सागर यांनी निवडणुकीसाठी बराच प्रचार केला असला तरी अंतिम मतदानात जवळपास ३ टक्क्यांची घट झाली आहे. कांदिवली पूर्व येथेही भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गोयल यांच्या प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आवाहन केले होते. मात्र येथेही एक टक्क्याने मतदान कमीच झाले.

मालाड या एकाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे महाविकास आघाडीचा प्रचार करत होते. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या जवळपास सर्व प्रचारफेऱ्यांमध्ये मतदानाचे आवाहन केले. मात्र या भागातील मुस्लिम मतदारांचा सहभाग यंदा मतदानात दिसून न आल्याने येथील मतदानात ३ टक्क्यांची घट झाली, हे विशेष समजण्यात येते.  

मतदानाची टक्केवारी - मुंबई उत्तर
विधानसभा    २०१९    २०२४
 

बोरिवली    ६६.२२    ६२.५० 
दहिसर    ६२.३९    ५८.१२
मागाठाणे    ५७.७१    ५५.६६ 
कांदिवली पूर्व    ५५.७१    ५४.४८ 
चारकोप    ६०.३२    ५७.८३ 
मालाड पश्चिम    ५६.९२    ५३.५२

Web Title: Mumbai North Lok Sabha Constituency: Confusion due to low turnout, what exactly will happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.