Pakistan Egypt Crisis: सौदीच्या घोषणेनं कंगाल पाक-इजिप्तचं टेन्शन वाढलं; अटींशिवाय पैसे नाही, थेट बजावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:22 IST2023-04-03T14:19:46+5:302023-04-03T14:22:36+5:30
आता सौदी अरेबियानं आपल्या धोरणांत मोठे बदल करत असल्याचं जाहीर केलं आहे.

Pakistan Egypt Crisis: सौदीच्या घोषणेनं कंगाल पाक-इजिप्तचं टेन्शन वाढलं; अटींशिवाय पैसे नाही, थेट बजावलं
कच्च्या तेलाचा अफाट साठा असलेल्या सौदी अरेबियानं मुस्लिम देशांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी अनेक दशकांपासून पाकिस्तानपासून इजिप्तपर्यंत कोणत्याही विशेष अटीशिवाय अब्जावधी डॉलर्स दिले. मात्र आता सौदी अरेबियानं आपल्या धोरणांत मोठे बदल करत असल्याचं जाहीर केलं आहे. सौदी अरेबियानं इजिप्तला आपला सामरिक मित्र मानलं आणि आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सची मदत दिली आहे. आता इजिप्त आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अतिशय गंभीर आर्थिक संकटात सापडले असू सौदी अरेबिया या दोन्ही देशांपासून अंतर ठेवून आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे आता सातत्यानं कठोर अटी लादत आहेत आणि सबसिडी संपवून सरकारी कंपन्या खाजगी हातात देण्याची मागणीदेखील करत आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, यामागचं प्रमुख कारण म्हणजे कच्च्या तेलातून सौदी अरेबियाची कमाई कमी होणं असल्याचं सांगण्यात येतंय. खरं तर, जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाची निर्यात करणारा देश सौदी अरेबिया २०२२ मध्ये २८ अब्ज डॉलर्सचा बजेट सरप्लस होता आणि याचं कारण युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. एवढी कमाई करूनही सौदी अरेबियाकडून इजिप्त, पाकिस्तान आणि लेबनॉन यांसारख्या कर्जबाजारी देशांसोबत कडक कारवाई केली जात आहे. आता लाभासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणं हे सौदी अरेबियाचं ध्येय असून त्यासाठी अजूनही तो परदेशात पैसे पाठवत आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वाहनांसारख्या उद्योगांना आपल्या देशात चालना देण्याचाही त्यांचा मानस आहे.
युएईच्या मार्गावर सौदी
“पूर्वी आम्ही थेट मदत द्यायचो आणि कोणत्याही अटीशिवाय पैसे जमा करायचो. आम्ही आता त्यात बदल करत आहोत. आम्ही अनेक संस्थांसोबत काम करत आहोत आणि आम्हाला सुधारणा पहाव्या लागतील,” असं सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल जदान यांनी जानेवारीत दावोसमध्ये स्पष्ट केलं होतं. या बदलानंतर सौदी आणि इजिप्शियन तज्ज्ञांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. सौदी अरेबिया आणि यूएईच्या पैशावर इजिप्त मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यानंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्यात कोणताही परिणाम झाला नाही.