पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:40 IST2025-11-25T14:40:04+5:302025-11-25T14:40:29+5:30
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. अफगाण सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी 'X' पोस्टद्वारे या हल्ल्याची माहिती दिली.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमासंघर्षाने थांबण्याऐवजी आता अधिक हिंसक वळण घेतले आहे. शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून सोमवारी रात्री उशिरा हवाई हल्ला केला. या क्रूर कारवाईत ९ निष्पाप बालके आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला असून, ४ जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. अफगाण सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी 'X' पोस्टद्वारे या हल्ल्याची माहिती दिली.
नेमकी घटना काय घडली?
खोस्त प्रांतातील गोरबुज जिल्ह्याचा मुगलगई परिसर आणि कुनार व पक्तिका भागात हा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास एका घरावर बॉम्ब फेकण्यात आले. यात वलीयत खान नावाच्या स्थानिक नागरिकाचा तसेच त्याच्या घरात राहत असलेले नऊ मुलांचा मृत्यू झाला. कुनार आणि पक्तिका भागात झालेल्या हवाई हल्ल्यात आणखी ४ नागरिक जखमी झाले आहेत.
सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तुर्कीचे एक शिष्टमंडळ इस्लामाबाद आणि काबुलचा दौरा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे अफगाणिस्तानातील माजी राजदूत जालमे खलीलजाद यांनी दिली आहे. या ताज्या हल्ल्यांमुळे पुन्हा दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे.