पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 06:02 IST2025-10-20T06:02:33+5:302025-10-20T06:02:56+5:30
दोन्ही देशातील शस्त्रसंधीसाठी कतार व तुर्कस्तानने पुढाकार घेतल्याने पाकिस्तानने या देशांचे कौतुक केले आहे.

पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
इस्लामाबाद: एक आठवड्यापेक्षा अधिक काळापासून पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षांमध्ये अनेक जवान, नागरिक व दहशतवादी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांत तत्काळ शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे. सीमेवर कायमस्वरुपी शांतता निर्माण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. कतार व तुर्कस्तानच्या मध्यस्थीमुळे पाक व अफगाणमध्ये दोहा येथे वाटाघाटी झाल्या.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ व अफगाणिस्तानचे कार्यकारी संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधी करण्यासाठी एकमत झाल्याचे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. या वाटाघाटीदरम्यान, दोन्ही बाजूंनी तत्काळ शस्त्रसंधीसोबतच कायमस्वरूपी शांतता व स्थिरता मजबूत करण्यासाठी यंत्रणा उभारण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. दोन्ही देशातील शस्त्रसंधीसाठी कतार व तुर्कस्तानने पुढाकार घेतल्याने पाकिस्तानने या देशांचे कौतुक केले आहे.
अफगाण नेतृत्त्वाने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी गटावर तत्काळ कारवाई करण्याचे आवाहन करत पाकने दोहा येथे शस्त्रसंधीच्या चर्चेला सुरुवात केली.