सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:18 IST2025-05-28T18:16:57+5:302025-05-28T18:18:16+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचीही मोठी भूमिका होती.

सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानचा नवीन फील्ड मार्शल असीम मुनीर हाच या दहशतवादी हल्ल्याचा खरा सूत्रधार होता. या हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानी लष्करप्रमुखच नव्हे, तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. हा खळबळजनक खुलासा पाकिस्तानी लष्करात काम केलेल्या एका अधिकाऱ्याने केला आहे.
आदिल राजा यांचा मोठा खुलासा
हिंदी वृत्तवाहिनी इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराचे माजी मेजर आदिल राजा यांनी पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना कसे पाठिंबा देते आणि पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात हल्ले खडून आणतात, याचा खुलासा केला. आदिल राजा यांच्या विधानावरुन हे स्पष्ट झाले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग होता आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हाच याचा खरा सूत्रधार आहे.
असीम मुनीरने हे का केले?
मेजर आदिल राजा म्हणाले की, असीम मुनीर याने हे ऑपरेशन करण्यासाठी एक चाल खेळली. भारताकडून झालेल्या पराभवानंतर असीम मुनीर अस्वस्थ होता, आपले पद वाचवण्यासाठी काहीतरी मोठे करू इच्छित होता. यासाठीच त्याने पहलगाम येथे हा हल्ला घडवून आणला. यासाठी त्याला फील्ड मार्शल पदावर बढतीही मिळाली.
इतर अधिकाऱ्यांचाही समावेश
आदिल राजा यांनी इतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे सांगितले आहे. तीन स्टार जनरल आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिस इंटेलिजेंस (ISI) चा महासंचालक असीम मलिक याचाही या हल्ल्यात समावेश होता. 30 सप्टेंबर 2024 तो आयएसआयचा प्रमुख झाला. असीम मलिक हा लष्करप्रमुख असीम मुनीर याचा अत्यंत विश्वासू मानला जातो. त्यामुळेच असीम मलिक याल आयएसआयचे नेतृत्व देण्यासोबतच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोहम्मद शहाब असलम याचाही सहभाग होता. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी त्याचा थेट संपर्क होता. मोहम्मद शहाब असलम हा स्पेशल ऑपरेशन्स डिव्हिजनचे महासंचालक आहेत. हाच दहशतवाद्यांशी व्हॉट्सअॅप चॅटद्वारे बोलायचा आणि त्यांना निर्देश द्याायचा. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे नाव येऊ नये म्हणून, मोहम्मद शहाब अस्लमने दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी अफगाणिस्तान आणि मलेशियातील सिम कार्डचा वापर केला, अशी माहिती आदिल राजा यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना दिली आहे.