'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:21 IST2025-12-28T15:18:36+5:302025-12-28T15:21:05+5:30
Operation Sindoor: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.

'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. या कारवाईत भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईदरम्यान, आपल्याला बंकरमध्ये लपावे लागले होते, अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाई
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ठोस कारवाई करत मे महिन्याच्या सुरुवातीला ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर, तसेच त्यानंतर पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर तीव्र हल्ले करण्यात आले.
झरदारींची कबुली
या संपूर्ण घडामोडींवर एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले. झरदारी म्हणाले, भारताने हल्ला केला, तेव्हा माझे मिलिट्री सेक्रेटरी माझ्याकडे आले आणि म्हणाले की, युद्ध सुरू झाले आहे. त्यांनी मला सुरक्षिततेसाठी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पण, मी त्यांना नकार दिला. बंकरमध्ये मरणार नाही, मृत्यू यायचा असेल, तर इथेच मरेल, असे मी त्यांना सांगितले, असे झरदारी म्हणाले. त्यांच्या या कबुलीवरुन भारताची कारवाई किती गंभीर होती, याची स्पष्ट जाणीव पाकिस्तानच्या नेतृत्वालाही झाली होती, हे दिसून येते.
7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात
भारताने 7 मेच्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात केली. या कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर, भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
युद्धविरामासाठी पाकिस्तानकडून पुढाकार
भारतीय कारवाईनंतर सीमारेषेवर तणाव वाढला. पाकिस्तानकडून सीमापार गोळीबार तीव्र झाला, मात्र भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पाकिस्तानला संघर्षविरामासाठी पुढाकार घ्यावा लागला. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधून सीजफायरचा प्रस्ताव मांडला, जो भारताने स्वीकारला.