नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर हाती भारतीय सैन्याने पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करून भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशात आणखी तणाव वाढला आहे. भारताने सीमाभागातील सर्व राज्यात सुरक्षा वाढवली आहे. त्याशिवाय दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्यानंतर एलओसीवर सातत्याने गोळीबार सुरू केला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाचे सावट आहे. यातच बड्या देशांनी त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिका, ब्रिटन यांनी मार्गदर्शक सूचना जारी करत भारत आणि पाकिस्तानातील भागात प्रवास करू नका असा सल्ला दिला आहे. लष्करी हालचाली आणि हवाई क्षेत्र बंदी या शीर्षकाखाली पाकिस्तानातील अमेरिकन दूतावासाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. दहशतवाद आणि सशस्त्र दलाच्या संघर्षाच्या शक्यतेमुळे भारत पाकिस्तान सीमेत आणि नियंत्रण रेषेच्या परिसरात अमेरिकन नागरिकांना प्रवास करू नका असं सांगण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. त्यामुळे अमेरिकेच्या दूतावासाने अमेरिकन नागरिकांना "सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा" असा सल्ला दिला आहे. अमेरिकेसह ब्रिटननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किमी आणि नियंत्रण रेषेच्या १६ किमी अंतरावर प्रवास करू नका असं सांगितले आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ब्रिटीश नागरिकांनी योग्य त्या सूचनांचे पालन करावे असं सांगण्यात आले आहे. चीननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात या दोन्ही देशात प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
१०० हून अधिक दहशतवादी ठार
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्रीनंतर, बुधवारची पहाट उजाडत असताना अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला.