एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:10 IST2026-01-02T09:51:05+5:302026-01-02T10:10:17+5:30
स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध नाइटक्लबमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ४७ लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतुर असताना आणि जल्लोष साजरा करत असताना, स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहर असलेल्या क्रान्स-मोंटानामध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका प्रसिद्ध नाइटक्लबमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत ४७ लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ११५ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका क्षुल्लक चुकीमुळे आनंदाच्या क्षणांचे रूपांतर स्मशानशांततेत झाले असून, या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
नव्या वर्षाची चाहूल लागताच 'ले कॉन्स्टेलेशन' या बेसमेंटमधील क्लबमध्ये शेकडो तरुण-तरुणी नाचत होते. एम्मा नावाच्या एका तरुणीने 'BFMTV'शी बोलताना सांगितले की, "मध्यरात्रीच्या सुमारास एका पुरुष बारटेंडरने आपल्या महिला सहकाऱ्याला खांद्यावर उचलून घेतले होते. त्या महिलेच्या हातात शॅम्पेनची बाटली होती आणि त्यावर शोभेची पेटती मेणबत्ती लावली होती. नाचताना ती पेटती बाटली क्लबच्या लाकडी छताला घासली आणि काही सेकंदातच आगीने रौद्र रूप धारण केले."
खिडक्या फोडून जीवाच्या आकांताने धावले पर्यटक
क्लब बेसमेंटमध्ये असल्याने आणि छत लाकडी असल्याने आग वेगाने पसरली. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण क्लब विषारी धुराने भरला. १६ वर्षांच्या एक्सेल क्लाविए या मुलाने सांगितले की, "आत काहीच दिसत नव्हते, फक्त किंकाळ्या ऐकू येत होत्या. श्वास घेता येत नव्हता म्हणून मी टेबलच्या खाली लपलो आणि नंतर खिडकी तोडून बाहेर आलो. माझे अनेक मित्र अजूनही बेपत्ता आहेत." बाहेर पडण्याचे रस्ते अरुंद असल्याने अनेकांची तिथेच चिरडून आणि गुदमरून मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटवणे कठीण
या आगीची भीषणता इतकी होती की, सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झाले आहेत. क्रान्स-मोंटानाचे महापौर निकोलस फेरो यांनी सांगितले की, "शवविच्छेदन आणि ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, परंतु मृतदेह ओळखणे कठीण झाल्याने यासाठी काही दिवसांचा अवधी लागू शकतो. जोपर्यंत आम्ही शंभर टक्के खात्री करत नाही, तोपर्यंत नातेवाईकांना कोणतीही माहिती देऊ शकत नाही."
५ दिवसांचा राष्ट्रीय शोक
या भीषण दुर्घटनेनंतर स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गी परमलां यांनी देशात ५ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. "हे आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक प्रकरण आहे," असे त्यांनी म्हटले आहे. मृतांमध्ये अनेक विदेशी पर्यटकांचाही समावेश असण्याची भीती आहे, विशेषतः फ्रान्सने त्यांचे ८ नागरिक बेपत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे.