भारतीय खलाशाचा आपल्या हद्दीत मृत्यू झाल्यावर ओमानच्या नौदलाने घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 19:10 IST2026-03-02T19:06:47+5:302026-03-02T19:10:55+5:30
Indian Died in Oman Sea: ओमानच्या समुद्रात ड्रोन हल्ल्यामुळे भारतीय खलाशाचा मृत्यू

भारतीय खलाशाचा आपल्या हद्दीत मृत्यू झाल्यावर ओमानच्या नौदलाने घेतला महत्त्वाचा निर्णय
Indian Died in Oman Sea: सध्या जगाच्या विविध भागांत युद्धजन्य परिस्थिती दिसत आहे. अफगाणिस्तानी तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु असतानाच, अचानक इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु झाला. या युद्धात इस्रायली अमेरिकेनेही सहभाग घेत इराणवर हल्ला चढवला. मग इराणकडूनही प्रत्युत्तराची कारवाई सुरु झाली. या साऱ्या गोंधळादरम्यान, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला, तर इतर सर्व जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी सोमवारी (२ मार्च) घटनेची पुष्टी केली. टँकर त्याच्या नियोजित मार्गावर जात असताना समुद्रात हा हल्ला झाला. आपल्या सागरी क्षेत्रात हल्ला आणि भारतीयाचा मृत्यू झाल्यानंतर ओमानच्या नौदलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ओमान नौदलाची तैनाती
या विचित्र घटनेनंतर, रॉयल ओमान नेव्हीने घटनास्थळी एक जहाज तैनात केले आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी जहाज खराब झालेल्या टँकरवर लक्ष ठेवून आहे. समुद्रातून प्रवास करणाऱ्या इतर जहाजांना सावधगिरी बाळगण्याचा आणि प्रभावित क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सागरी मार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.
ड्रोन बोटीची टँकरशी धडक
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले की, ही घटना शनिवारी (१ मार्च) मस्कत प्रांतातील सुलतान काबूस बंदराच्या वायव्येस सुमारे ५२ नॉटिकल मैल अंतरावर घडली. मार्शल आयलँड प्रजासत्ताकाचा ध्वज फडकवणारा आणि MKD VYOM म्हणून ओळखला जाणारा टँकर हल्ल्याच्या वेळी अंदाजे ५९,४६३ मेट्रिक टन माल वाहून नेत होता. ओमानच्या सागरी सुरक्षा एजन्सी, मेरीटाईम सिक्युरिटी सेंटरच्या मते, ही घटना शनिवार १ मार्चला घडली. अधिकाऱ्यांच्या मते, ड्रोन बोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवरहित जहाजाची थेट टँकरशी धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की त्यामुळे जहाजाच्या मुख्य इंजिन रूममध्ये आग लागली आणि स्फोट झाला. स्फोट आणि त्यामुळे इंजिन रूममध्ये लागलेल्या आगीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. या घटनेत जहाजाच्या क्रूचा भाग असलेल्या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला.
जहाजावर एकूण २१ लोक
मिळालेल्या वृत्तानुसार, हल्ल्याच्या वेळी जहाजावर एकूण २१ लोक होते. यामध्ये १६ भारतीय, चार बांगलादेशी आणि एक युक्रेनियन नागरिक होता. घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. पनामाच्या ध्वजाखाली चालणाऱ्या एमव्ही सँड या व्यापारी जहाजाने बचाव कार्यात मदत केली. सागरी सुरक्षा केंद्राच्या समन्वयाने, सर्व वाचलेल्या क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की वाचवण्यात आलेले सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.