तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:50 IST2026-03-26T12:47:45+5:302026-03-26T12:50:20+5:30
Bab El Mandeb Strait: होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने पहिला तडाखा दिला. त्यानंतर अमेरिकेकडून लष्करी हालचाली वाढल्याची चर्चा सुरू होताच, बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा दिला आहे.

तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे युद्ध पूर्णपणे संपवण्याबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे नवी माहिती समोर आली आहे की, अमेरिकेचे लष्कर ३००० सैनिकांना पश्चिम आशियात उतरवणार असून, इराणच्या खार्ग बेटावर हल्ला करू शकते. ही माहिती काही वृत्तसंस्थांच्या रिपोर्टमधून समोर आल्यानंतर इराणने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. खार्ग बेटावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीही बंद करू, असे इराणने म्हटले आहे.
एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्याने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर इराण आता बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीही बंद करून टाकेन.'
इराणकडे इच्छाही आहे आणि ताकदही
अधिकाऱ्याने तस्नीम वृत्तसंस्थेला सांगितले की, 'जर शत्रूने इराणच्या बेटांवर किंवा इराणच्या सीमेत असलेल्या कोणत्याही ठिकाणी जमिनीवर उतरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, फारस खाडी किंवा ओमानच्या सागरात नौदलाच्या हालचाली वाढवून इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सरप्राईज म्हणून नवी आघाडी उघडू. बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी जगातील सगळ्यात राजनैतिक सामुद्रधुनींपैकी एक आहे आणि इराणकडे याला पूर्ण धोका तयार करण्याची इच्छाशक्ती आणि ताकद आहे."
'अश्रूंचे द्वार', कोणत्या महासागरांना जोडते?
बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीला अश्रूंचे द्वार म्हणून ओळखले जाते. ही सामुद्रधुनी येमेन आणि जिबूती/इरिट्रिया (आफ्रिका) यांच्यामध्ये असलेला २० ते ३० किमी रुंदीचा मोठा जलमार्ग आहे. लालसागराला अदानच्या खाडीशी आणि हिंद महासागराला हा मार्ग जोडतो.

सुवेझ कालव्याच्या माध्यमातून आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापारासाठीही हा जलमार्ग महत्त्वाचा आहे. जगातील एकूण कच्च्या तेलापैकी २० टक्के तेल वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून, तर १२ टक्के तेल वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. त्यामुळेच इराणने आता या मार्गावरुन अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
खार्ग बेट इराणची लाइफलाइन
खार्ग बेट हे इराणची लाइफलाईन म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी इस्रायलने याच बेटावर हवाई हल्ले केले होते. मात्र, त्यात लष्करी ठिकाणांना लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले होते. खार्ग बेटावरून इराण ९० टक्के कच्चे तेल निर्यात करतो. याच बेटावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली गेल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे.