आता ३ जणांनी इस्रायलला घेरलं, तिन्ही बाजूंनी भीषण हल्ले; इराणनं डागले 70 मिसाइल! ही मोठी शहरं निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:03 IST2026-02-28T17:03:07+5:302026-02-28T17:03:58+5:30
येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आता ३ जणांनी इस्रायलला घेरलं, तिन्ही बाजूंनी भीषण हल्ले; इराणनं डागले 70 मिसाइल! ही मोठी शहरं निशाण्यावर
मध्य-पूर्वेत संघर्षाचा भडका उडाला आहे. इराण-इस्रायलयुद्ध थेटले आहे. इराणनेइस्रायलवर अत्यंत भीषण जवाबी हल्ले चढवले आहेत. इराणने आतापर्यंत ७० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली आहेत. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या हल्ल्याची पुष्टी केली असून संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला आहे.
इस्रायलची येरुशलेम, हाइफा आणि शेफेल्लाह यांसारखी मोठी शहरे इराणच्या निशाण्यावर आहेत. येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, इराणने क्षेपणास्त्रांची दुसरी मोठी खेपही इस्रायलवर डागली आहे. ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांची पहिली खेप पूर्ण झाली असल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) म्हटले आहे. मात्र त्यांनी नुकसानीसंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.
इस्रायलमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही -
तर दुसऱ्या बाजूला, इस्रायलने आपली क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली (Anti-Missile Defense System) कार्यान्वित केली असून, संपूर्ण देशात 'स्पेशल स्टेट ऑफ इमर्जन्सी' घोषित करण्यात आली आहे. इस्रायली रुग्णवाहिका सेवेनुसार, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र एका मिसाईल निर्जनस्थळी पडल्याचे समजते.
हूती आणि हिजबुल्ला इराणच्या मदतीला -
या युद्धाचे स्वरूप आता अधिक व्यापक होत चालले आहे. इराणच्या समर्थनार्थ येमेनमधून हूती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाइल्स डागली आहेत. तसेच लेबनॉनमधून हिजबुल्लानेही हल्ले सुरू केले आहेत.
लेबनॉनच्या पंतप्रधानांचा हिजबुल्लाहला इशारा -
या पार्श्वभूमीवर, बेरूतला कोणत्याही युद्धाच्या आगीत ओढले जाऊ देणार नाही, असा इशारा लेबनॉनच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाला दिला आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे समर्थक गट अधिक आक्रमक झाल्याने, या युद्धाची दाहकता अधिकच वाढली आहे.