व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट लेडी' नाही तर 'फर्स्ट कॉम्बॅटंट'! कोण आहेत सिलिया फ्लोरेस? ज्यांना अमेरिकेने बेडरूममधून उचललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:08 IST2026-01-04T13:05:29+5:302026-01-04T13:08:11+5:30
निकोलस मादुरोच नाही, तर त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यादेखील आता अमेरिकेच्या कैदेत आहेत.

व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट लेडी' नाही तर 'फर्स्ट कॉम्बॅटंट'! कोण आहेत सिलिया फ्लोरेस? ज्यांना अमेरिकेने बेडरूममधून उचललं
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर केवळ निकोलस मादुरोच नाही, तर त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यादेखील आता अमेरिकेच्या कैदेत आहेत. शनिवारी पहाटे अमेरिकन कमांडोनी मादुरो दाम्पत्याला त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढले आणि थेट विमानात बसवून अमेरिकेला रवाना केले. व्हेनेझुएलाच्या राजकारणात सिलिया फ्लोरेस या केवळ राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी नाहीत, तर त्या देशाच्या सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक मानल्या जातात.
'फर्स्ट लेडी' नव्हे, 'फर्स्ट कॉम्बॅटंट'!
जगात राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला 'फर्स्ट लेडी' म्हटले जाते, मात्र सिलिया फ्लोरेस यांनी ही पदवी नाकारली होती. त्या स्वतःला 'प्रिमेरा कॉम्बातींते' म्हणजेच 'फर्स्ट कॉम्बॅटंट' अर्थात पहिली योद्धा म्हणवून घेतात. गेल्या ३० वर्षांपासून त्या मादुरो यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागील सर्वात मोठी ताकद राहिल्या आहेत. मातीच्या घरात जन्म ते सत्तेचे शिखर सिलिया यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा आहे.
कोण आहेत सिलिया फ्लोरेस?
१५ ऑक्टोबर १९५६ रोजी एका छोट्या गावात ६ भावंडांमध्ये त्या सर्वात लहान होत्या. त्यांचे बालपण मातीच्या भिंती आणि कच्च्या जमिनीच्या घरात गेले. वडील सेल्समन होते. कुटुंबासह राजधानी काराकासमध्ये आल्यावर त्यांनी खासगी विद्यापीठातून गुन्हेगारी कायद्याचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी १० वर्षे डिफेन्स वकील म्हणून काम केले. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेज यांची वकील म्हणून काम पाहिल्यावर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
इतिहास घडवणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्ष
सिलिया फ्लोरेस यांनी व्हेनेझुएलाच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. २००० मध्ये त्या पहिल्यांदा संसदेत निवडून आल्या. २००६ ते २०११ या काळात त्या संसदेच्या अध्यक्ष होत्या. व्हेनेझुएलाच्या संसदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या. २०१२ मध्ये त्यांची नियुक्ती देशाच्या अटॉर्नी जनरल पदी करण्यात आली होती.
मादुरो यांच्याशी कशी झाली ओळख?
काराकासमध्ये काम करत असताना त्यांची ओळख एका युनियन नेत्याशी झाली, जो तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चावेज यांना सल्ला देत असे. तो नेता म्हणजे निकोलस मादुरो. तिथूनच या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. चावेज यांच्या निधनानंतर मादुरो राष्ट्राध्यक्ष बनले आणि जुलै २०१३ मध्ये दोघांनी अधिकृतपणे लग्न केले.
आता पुढे काय?
अमेरिकेने या शक्तिशाली दाम्पत्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर आरोप ठेवला आहे. 'फर्स्ट कॉम्बॅटंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलिया फ्लोरेस यांना आता न्यूयॉर्कमधील न्यायालयात आपल्यावरील आरोपांचा सामना करावा लागणार आहे. एका गरीब घरातील मुलगी ते देशाची सर्वात शक्तिशाली महिला आणि आता अमेरिकेची कैदी, असा हा चक्रावून टाकणारा प्रवास आता कोणत्या वळणावर थांबतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.