No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:23 IST2026-01-12T10:22:45+5:302026-01-12T10:23:47+5:30
ही घटना लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड भागातील विलशायर फेडरल बिल्डिंग बाहेर घडली. येथे इराण सरकारविरोधात निदर्शन सुरू होते. या हल्ल्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे समजते.

No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
इराणच्या राजेशाही विरोधातील संघटना मुजाहिदीन-ए-खल्क (MEK) चे स्टिकर असलेला एक यू-हॉल ट्रक अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये रजा पहलवी यांच्या समर्थनार्थ आणि खामेनेई यांच्या विरोधात सुरू असलेल्या रॅलील घुसला आणि बघता-बघता निदर्शकांना चिरडून गेला. संबंधित ट्रकवर 'No Shah' म्हणजेच 'शाह नकोत', असे लिहिले होते.
ही घटना लॉस एंजेलिसमधील वेस्टवुड भागातील विलशायर फेडरल बिल्डिंग बाहेर घडली. येथे इराण सरकारविरोधात निदर्शन सुरू होते. या हल्ल्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे समजते.
सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनांच्या समर्थनार्थ, अमेरिकेत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हजारो नागरिक सहभागी झाले होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता या रॅलीला सुरुवात होणार होती. या ट्रकवर “No Regime”, “America Don’t Repeat 1953”, “No Mullah” असा राजकीय संदेश लिहिलेला होता. हे घोषवाक्य १९५३ सालची आठवण करून देते. तेव्हा इराणचे तत्कालीन पंतप्रधान मोसाद्देक यांना हटवून अमेरिकेने शाह यांना पुन्हा सत्तेवर बसवले होते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर पोलिसांनी यू-हॉल ट्रकमधून एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याला तेथून घेऊन जात असताना संतप्त आंदोलकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर झेंड्याला असलेल्या काठ्यांनीही मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.