रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:21 IST2025-10-16T11:15:06+5:302025-10-16T11:21:03+5:30
भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
Donald Trump on Russian Oil: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारत लवकरच रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवेल असा दावा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे आश्वासन दिल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचा युक्तिवाद आहे की, भारताने रशियन तेल खरेदी थांबवल्यास, युक्रेन युद्धामुळे रशियावर दबाव टाकण्याच्या जागतिक प्रयत्नांना खूप मोठी मदत होईल. मात्र, ट्रम्प यांच्या या खळबळजनक वक्तव्यावर भारत सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी भारताची भूमिका कायम असणार असल्याचे म्हटलं.
भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करणे सुरू ठेवणे अमेरिकेला मान्य नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी वारंवार भारताला रशियाकडून तेल खरेदी करु नये असा इशारा देत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वॉशिंग्टन नवी दिल्लीवर रशियाकडून तेल आयात थांबवण्यासाठी दबाव आणत आहे, जो भारताच्या एकूण तेल आयातीपैकी एक तृतीयांश आहे. अशातच १५ ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांनी मोठा दावा केला. "त्यांनी (पंतप्रधान मोदी) मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही तेच करायला लावणार आहोत," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
भारत सरकारने यापूर्वी वारंवार हे स्पष्ट केले आहे की, भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सर्वात स्वस्त आणि परवडणारे इंधन जिथे उपलब्ध असेल, तिथून ते खरेदी केले जाईल. रशियावर पाश्चात्त्य देशांनी निर्बंध लादल्यानंतर, रशियन कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. जागतिक बाजारात उपलब्ध असलेल्या या सवलतीच्या दराचा फायदा भारताने घेतला. भारतासाठी हा निर्णय केवळ ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर देशातील वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी इंधनाचे दर परवडणारे ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, ऊर्जा खरेदीचे निर्णय बाजारपेठेतील उपलब्धता, किंमत आणि राष्ट्रीय हित यांवर आधारित असतात. त्यामुळे, अमेरिकेच्या दबावाखाली किंवा कोणत्याही एका देशाच्या राजकीय इच्छेमुळे भारताचे धोरण बदलणार नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याला भारत सरकारने अधिकृतपणे होकार दिलेला नाही. त्यामुळे, भारताचे तेल खरेदीचे धोरण पूर्वीप्रमाणेच ग्राहकांच्या फायद्याला महत्त्व देणारे राहील, हे स्पष्ट होते.