जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शोधून संपवू! 'ही समाजसेवा नाही' म्हणत अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 20:16 IST2026-03-02T20:15:08+5:302026-03-02T20:16:14+5:30
अमेरिकन संरक्षण सचिवांनी यावेळी इराकसारख्या दलदलीत अडकणार नाही म्हणत इराणला इशारा दिला आहे.

जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शोधून संपवू! 'ही समाजसेवा नाही' म्हणत अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा
US Warn Iran: इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अत्यंत कडक आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. "युद्धात कसलेही फालतू नियम नसतात, लष्कराचे काम लोकशाही निर्माण करणे किंवा समाजसेवा करणे नाही, तर फक्त शत्रूला जिंकणे आणि संपवणे हेच आहे," अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेची भूमिका जगासमोर जाहीर केली आहे.
"आम्ही युद्ध सुरू केलं नाही, पण संपवणार आम्हीच"
इस्त्राईल-इराण संघर्षावर बोलताना हेगसेथ म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आता मागे हटणार नाही. "त्यांनी अमेरिकनांविरुद्ध युद्ध पुकारलं, आता आम्ही त्यांच्या अयातुल्लांविरुद्ध सूड उगवू. गेल्या ४७ वर्षांपासून इराणने जो शत्रूभाव जपला, त्याला पूर्णविराम देण्यासाठी ४७ व्या राष्ट्राध्यक्षांची (ट्रम्प) गरज होती. जर तुम्ही अमेरिकन नागरिकांना माराल किंवा जगात कुठेही त्यांना धमकावाल, तर आम्ही कोणतीही माफी न मागता आणि संकोच न बाळगता तुम्हाला शोधून काढू आणि तुमचा खात्मा करू," असा इशारा पीट हेगसेथ यांनी दिला.
"हा इराक नाही, आम्ही दलदलीत अडकणार नाही"
मध्य-पूर्वेतील गेल्या काही दशकांतील युद्धांशी तुलना करताना हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, इराणमधील कारवाई ही इराक युद्धासारखी वर्षानुवर्षे चालणारी नसेल. अमेरिका इराकप्रमाणे कोणत्याही दलदलीत अडकणार नाही. ही लष्करी कारवाई तेहरानची लष्करी ताकत आणि अणू महत्त्वाकांक्षा पूर्णपणे ठेचून काढण्यासाठी चालवलेली एक निर्णायक मोहीम आहे. अमेरिकेचा मूळ उद्देश इराणमधील अण्वस्त्रे नष्ट करणे हा आहे, असेही हेगसेथ यांनी सांगितले.
पीट हेगसेथ यांनी लष्करी नियमांबाबत मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, युद्धाच्या काळात असे कोणतेही नियम असू नयेत ज्यामुळे शत्रूवर हल्ला करताना सैनिकांचे हात बांधले जातील. "आम्ही जिंकण्यासाठी लढतो, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. लष्कराचे काम समाजसेवा करणे नाही, तर शत्रूला नामोहरम करणे हेच आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
...तर डोंगराच्या खाली अणुप्रकल्प लपवले नसते
"इस्त्रायल-इराण संघर्षावर बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. इराणसारखी कट्टर इस्लामिक विचारसरणी असलेली राजवट, जी विनाशाच्या मार्गावर आहे, त्यांच्याकडे अण्वस्त्रे असूच नयेत. हे बोलणारे अनेक जण आहेत, पण प्रत्यक्षात कारवाई करण्याची हिंमत फक्त आमच्या राष्ट्राध्यक्षांकडे (ट्रम्प) आहे. आज इराणचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. हतबल झालेला शत्रू आता शेजारील देशांतील हॉटेल्स, विमानतळ आणि सामान्य नागरिकांच्या घरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव करत आहे. ही दहशतवादी वृत्ती आहे. इराणच्या नेतृत्वाने आजवर फक्त दहशतवादी गट, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि जमिनीखाली खोल गाडलेले अणू प्रकल्पच उभे केले आहेत. जर त्यांचे अणू प्रकल्प शांततेसाठी असते, तर ते डोंगरांच्या खाली लपवण्याची गरज नव्हती," असेही हेगसेथ म्हणाले.
सत्तापालट की अण्वस्त्र नाश?
सुरवातीला ही लढाई सत्तापालटासाठी असल्याचे बोलले जात असले तरी, अधिकृत निवेदनात अमेरिकेने म्हटले आहे की, आमचे मुख्य लक्ष्य इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करणे हेच आहे. इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य केल्यास त्याचे परिणाम अत्यंत भयावह असतील, असा इशाराही पेन्टागॉनने दिला आहे.