No loan oil supply for Pakistan says Saudi Arabia | पाकिस्तानला जबरदस्त दणका; सौदी अरेबियानं कर्ज, तेल पुरवठा रोखला

पाकिस्तानला जबरदस्त दणका; सौदी अरेबियानं कर्ज, तेल पुरवठा रोखला

रियाध : पाकिस्तानला यापुढे कर्ज तसेच तेलाचा पुरवठा करणार नसल्याचे सौदी अरेबियाने जाहीर केले आहे. अशा रीतीने या दोन देशांतील घनिष्ठ मैत्री आता संपुष्टात आली आहे. काश्मीर प्रश्नावर भारताविरोधात भूमिका न घेतल्याबद्दल सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी)ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता.

यासंदर्भात मिडल इस्ट मॉनिटर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, सौदी अरेबियाला पाकिस्तानने १ अब्ज डॉलर देणे बाकी आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी २०१८ साली ६.२ अब्ज डॉलरची मदत देण्याचे ठरविले होते. त्यातील ३ अब्ज रुपये कर्जरुपाने व ३.२ अब्ज डॉलर तेल पुरवठ्याच्या स्वरुपात देण्यात येणार होते. सौदी अरेबियाचे युवराज मुहम्मद बिन सलमान हे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना, मदतीसंदभार्तील या करारावर स्वाक्षºया झाल्या होत्या.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मीरबाबत भारताविरोधात भूमिका घेणे ओआयसी संघटनेला व सौदी अरेबियाला जमणार नसेल तर पाकिस्तान सर्व इस्लामी देशांची स्वतंत्रपणे बैठक बोलाविण्याचा विचार करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा भारताने निर्णय घेतला. 

त्यानंतर या मुद्द्यावर ओआयसी संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पण ती या संघटनेने अद्याप मनावर घेतलेली नाही. काश्मीरप्रश्नी भारताविरोधात भूमिका घ्यायची का याबाबत इस्लामी देशांमध्येच मतभेद आहेत व पाकिस्तानचा आवाज फारच दुबळा आहे अशी खंत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २२ मे रोजी व्यक्त केली होती.

मालदीवने दिला भारताला पाठिंबा
काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेला मालदीवने विरोध केला आहे. त्या देशाच्या प्रतिनिधी तिल्मिझा हुसेन यांनी सांगितले की, इस्लामी विचारसरणीची ढाल करून पाकिस्तान भारताविरोधात जे डावपेच लढवत आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील धार्मिक सलोख्याला तडा जाईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No loan oil supply for Pakistan says Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.