तियानजीन : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, हा हल्ला केवळ भारताच्याच नव्हे, तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक राष्ट्राच्या अंतरात्म्यावरचा आघात होता, अशी परखड टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. चीनमधील तियानजीन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाला खडेबोल सुनावले.
मोदी म्हणाले, दहशतवादाविरोधी लढ्यात कोणीही दुतोंडी भूमिका घेऊ नये. काही देश दहशतवादाला उघड पाठिंबा देत आहेत, हे इतर देशांना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. भारताने दहशतवादाचे गंभीर परिणाम भोगले आहेत. ७ मे रोजी भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळ 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे नष्ट केले होते. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्व देशांनी एकत्र येऊन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करण्याचे आवाहन केले. दरम्यान, सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीच्या स्थळी आपल्या लिमोझिनमधूनच नेले. यावेळी दोन्ही नेत्यांत गाडीतून खाली न उतरताच एकांतात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एससीओकडून तीव्र निषेध२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानही सदस्य असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) तीव्र शब्दांत निषेध केला. तर दहशतवादविरोधी लढ्यात दुतोंडी भूमिका खपवून घेऊ नका, या भारताच्या भूमिकेशी या संघटनेने सहमती दर्शविली. एससीओने म्हटले की, दहशतवाद्यांचा धोका रोखण्यासाठी सर्व देशांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचाही या परिषदेत निषेध करण्यात आला. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करणे, उत्पादन, पुरवठा साखळीमध्ये स्थिरता आणणे, या गोष्टी निवेदनात नमूद केल्या आहेत.