Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:14 IST2025-10-25T16:09:47+5:302025-10-25T16:14:34+5:30
Boy Swallows 200 Magnets: पोटदुखीने त्रस्त असलेल्या १३ वर्षाच्या मुलाला रुग्णालयात नेले. त्यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली की, त्याच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.

Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
न्यूझीलंडमधील एका १३ वर्षांच्या मुलाच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल २०० च्या आसपास लहान चुंबक काढल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. या चुंबकांनी मुलाच्या आतड्यांमध्ये गंभीर इजा केली, ज्यामुळे आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. मॅग्नेट गिळल्याने आतड्यांना मोठी इजा होते. तसेच हर्निया किंवा दीर्घकाळ पोटदुखी यांसारख्या समस्याचा सामना करावा लागतो, असा इशारा डॉक्टर बिनुरा लेकामलेज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला.
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर हा मुलगा तौरंगा रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी विचारणा केल्यावर त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी १०० हून अधिक लहान चुंबक गिळले. चुंबक गिळल्यानंतर चार दिवसांनी त्याचे पोट दुखायला सुरुवात झाली.
न्यूझीलंड मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, मुलाने डॉक्टरांना सांगितले की, त्याने ८० ते १०० चुंबक गिळले. मात्र, एक्स-रे आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना त्याच्या आतड्यांत जवळपास २०० निओडायमियम मॅग्नेट आढळून आले.एक्स-रेमध्ये हे चुंबक आतड्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेले. या चुंबकांच्या चार साखळ्या बनल्या होत्या, ज्या एकमेकांना तीव्रतेने ओढत होत्या. या दाबामुळे आतड्यांच्या पेशींना रक्त पुरवठा थांबला आणि मुलाच्या आतड्यांना मोठी इजा झाली. मुलाच्या पोटातून चुंबक काढण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियादरम्यान, चुंबक आणि खराब झालेल्या आतड्यांचे काही भाग काढून टाकण्यात आले.
विशेष म्हणजे, न्यूझीलंडमध्ये २०१३ पासून लहान, हाय-पॉवर चुंबकांच्या विक्रीवर बंदी असूनही, हे चुंबक ऑनलाइन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मुलाने डॉक्टरांना सांगितले की, त्याने गिळलेले चुंबक चीनच्या प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या टेमू रून खरेदी केले होते. टेमू कंपनीने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, कंपनी याची चौकशी करत आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, ही घटना केवळ चुंबकांच्या सेवनाचेच नाही, तर लहान मुलांसाठी ऑनलाइन मार्केटिंगचे धोके देखील अधोरेखित करते. मुलगा आठ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.