Nepali Prime minister kp oli turned communist to hindu worship visited pashupatinath temple first time | ...म्हणून कम्‍युनिस्‍टचे 'हिंदू' झाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली; धर्माला मानत होते 'अफू'ची गोळी

...म्हणून कम्‍युनिस्‍टचे 'हिंदू' झाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली; धर्माला मानत होते 'अफू'ची गोळी

काठमांडू - कार्ल मार्क्‍सच्या पावलावर पाऊल टाकत धर्माला 'अफूची गोळी' मानणाऱ्या आणि आयुष्यभर नेपाळच्या हिंदू राज्यपद्धतीला विरोध करणाऱ्या पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी सोमवारी पहिल्यांदाच पशुपतीनाथ मंदिरात जाऊन माथा टेकला आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात विशेष पूजा करत सव्वा लाख दिवेही लावले. एवढेच नाही, तर पशुपतीनाथ मंदिर हे सनातन धर्माचे पवित्र स्‍थान म्हणून विकसित करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, या मंदिरात जाऊन दर्शन घेणारे ओली, हे नेपाळचे पहिलेच कम्‍युनिस्‍ट पंतप्रधान आहेत. जाणून घेऊया, त्यांच्यात अचानकपणे झालेल्या या बदला मागचं नेमकं कारण...

नेपाळ हा कधी काळी जगातील एकमेव हिंदू देश होता. आता येथे पुन्हा एकदा राज्यपद्धती बहाल करण्याची आणि नेपाळला हिंदूराष्ट्र करण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच काळजीवाहू पंतप्रधान ओलींचे हृदय परिवर्तन झाले आहे. पंतप्रधान ओली सोमवारी पशुपतीनाथ मंदिरात गेले. ते येथे जवळपास सव्वा तास होते. नेपाळमधील वृत्तपत्र काठमांडू पोस्‍टने दिलेल्या वृत्तानुसार, कार्ल मार्क्‍सला मानणारे पीएम ओली आतापर्यंत कधीही कुठल्याही मंदिरात गेलेले नव्हते. मात्र, ओली अचानकपणे मंदिरात गेल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

नेपाळमध्ये राज्यपद्धती बहाल करण्यासंदर्भात आणि नेपाळला हिंदू राष्‍ट्र घोषित करण्यासाठी जोरदार निदर्शने होते आहेत. अशातच नेपाळच्या पंतप्रधानांनी या मंदिराला भेट दिली आहे. यामुळे, संसद भंग केल्यामुळे निर्माण झालेला असंतोश कमी करण्यासाठीच ओलींनी ही भेट दिल्याचे बोलले जात आहे. तसेच, ओलींचे हे पाऊल म्हणजे संविधानावरील हल्ला असल्याचेही बोलले जात आहे. कारण, संविधान हे नेपाळला एक धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र बनवते.

नेपाळच्या सत्ताधारी पक्षात दोन फड तयार झाले आहेत. नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ताधारी नेपाल कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीतून वेगळ्या झालेल्या गटाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी यासंदर्भात पुष्टी केली आहे, की केपी शर्मा ओली यांचे पार्टी सदस्यत्व नष्ट करण्यात आले आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ओली भारत आणि चीनमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते, आपण भारतासोबत चालाण्यास तयार आहोत, असे संकेतही देत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nepali Prime minister kp oli turned communist to hindu worship visited pashupatinath temple first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.