ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:23 IST2025-06-23T15:23:01+5:302025-06-23T15:23:25+5:30
अमेरिकेचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष तथा हवाई दलाचे जनरल डॅन केन म्हणाले, रविवारी फोर्डो तथा इतर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी 14 बॉम्ब वापरले गेले.

ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर हल्ले चढवून संपूर्ण जगाला चकित केले. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांबरोबरच, अमेरिकेने इस्रायल-इराण युद्धात प्रत्यक्ष उडी घेतल्याचेही सिद्ध झाले आहे. या हल्ल्यानंतर, 'आपण इराणचा फोर्डो अणुसंवर्धन प्रकल्प उद्ध्वस्त करण्यासाठी बहुचर्चित 'बंकर-बस्टर' बॉम्बचा वापर केला, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.' खरे तर, हा घातक बॉम्ब अत्याधुनिक स्टील्थ बी२ बॉम्बरच्या सहाय्याने टाकण्यास सक्षम असलेला अमेरिका हा एकमेव देश आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा बॉम्ब टाकण्यासाठी अमेरिकेचे बी-२ बॉम्बर्स कोणत्या मार्गाने इराणमध्ये पोहोचले. तर याचा खुलासा खुद्द अमेरिकेनेच केला आहे.
अमेरिकेने इराणवर 14 बॉम्ब टाकले -
इराणवरील हल्ल्यानंतर, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासोबत पत्रकारपरिषदेत बोलताना अमेरिकेचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष तथा हवाई दलाचे जनरल डॅन केन म्हणाले, रविवारी फोर्डो तथा इतर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी 14 बॉम्ब वापरले गेले. यावेळी त्यांनी एक नकाशाही दाखवला. यात बी-2 बॉम्बर्स विमाने अमेरिकेहून इराणपर्यंत कशी पोहोचली? तो मार्गही दाखवण्यात आला होता. या योजनेची माहती अमेरिका आणि टॅम्पातील फार कमी नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना हाता. या शिवाय, या बॉम्बर्समध्ये हवेतच अनेकवेळा ईंधनही भरण्यात आले.
अमेरिकेतून इराणला कसे पोहोचले अमेरिकन B-2 स्पिरिट बॉम्बर्स -
पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या नकाशानुसार, अमेरिकन बी-2 बॉम्बर्स अमेरिकेतून उड्डाण केल्यानंतर, उत्तर अटलांटिक महासागर पार करून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून इराणमध्ये पोहोचले. अमेरिकेने केलेल्या दाव्यानुसार, या दरम्यान अमेरिकन बॉम्बर्स बराच वेळ आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते. यानंतर त्यांनी, स्पेन आणि उत्तर आफ्रीकेतून भूमध्य सागरावरून उड्डाण केले. यानंतर ही विमाने इस्रायली हवाई हद्दीतून आधी जॉर्डनमध्ये पोहोचले, यानंतर त्यांनी इराक ओलांडला यानंतर त्यांनी इराणच्या अणुकेंद्रांवर बॉम्बिंग केली आणि परत माघारी फिरले.