सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 14:10 IST2018-08-18T14:10:52+5:302018-08-18T14:10:58+5:30

गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी नवज्योतसिंग सिद्धू खास भेट घेऊन गेले.

Navjot Singh Sidhu gifted a kashmiri shawl to his friend Pakistan PM Imran Khan | सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट

सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट

इस्लामाबादः पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते. राजकारणी म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून आलोय, असं सिद्धू यांनी स्पष्ट केलं. परंतु, काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी खास काश्मिरी शाल भेट नेण्याच्या त्यांच्या खेळीला त्यांचे चाहते 'छा गए गुरू' अशी दाद देताहेत. कारण, काश्मीर आमचं आहे, ही आमच्या देशातील भेट आहे, असा सूचक संदेशही त्यांनी या भेटीतून दिल्याचं बोललं जातंय.

गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. पृथ्वीवरचं हे नंदनवन त्यांना भारताकडून हिसकावून घ्यायचंय. परंतु, भारताने त्यांचे सगळे डाव उधळून लावलेत. त्यामुळे त्यांचा कायमच तीळपापड होतो. या पार्श्वभूमीवर, इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांनी प्रचारादरम्यान काश्मीरबाबत आक्रमक भूमिका घेतली होती, भारताला हिसका दाखवण्याची भाषा केली होती. अर्थात, निवडून आल्यानंतर त्यांचा सूर बदलला होता. पण, तरीही या नव्या 'वजीरा'वर सगळ्यांच्या नजरा आहेत. 


इम्रान खान यांनी भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंना - सुनील गावसकर, कपिल देव आणि नवज्योतसिंग या त्यांच्या तीन मित्रांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावलं होतं. त्यापैकी एकटे सिद्धू आज इस्लामाबादला पोहोचले. 

शेजाऱ्याच्या घरात आग लागली असेल तर त्याची छळ आपल्यालाही बसणार. म्हणूनच, इम्रानने पाकिस्तानला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जावं, भारत-पाकच्या मैत्रीसाठी पुढे यावं, अशी प्रार्थना मी करतो, अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी व्यक्त केली. इम्रान खानसाठी खास काश्मिरी शाल भेट म्हणून आणल्याचंही त्यांनी सांगितलं. 


अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याऐवजी सिद्धू यांनी पाकिस्तानला जाणं पसंत केल्यानं अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी गळाभेट घेतल्यानंही त्यांच्यावर टीका होत होती. तसंच, शपथविधी सोहळ्यावेळी सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुखांशेजारी बसवण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. परंतु, मी भारताचा सदिच्छा दूत म्हणून आलोय, असं सांगत सिद्धू यांनी सर्व विषयांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Navjot Singh Sidhu gifted a kashmiri shawl to his friend Pakistan PM Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.