निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:58 IST2026-01-02T07:56:17+5:302026-01-02T07:58:21+5:30
मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसाने आणि बर्फवृष्टीने अफगाणिस्तानच्या अनेक भागांत महाप्रलंयकारी स्थिती निर्माण केली आहे.

निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानवर आता निसर्गाचा प्रचंड कोप झाला आहे. मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसाने आणि बर्फवृष्टीने अफगाणिस्तानच्या अनेक भागांत महाप्रलंयकारी स्थिती निर्माण केली आहे. अचानक आलेल्या या पुरात आतापर्यंत किमान १७ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीने केवळ मानवी जीवच नव्हे, तर हजारो कुटुंबांचे संसार आणि पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे.
एकाच कुटुंबातील ५ जणांचा करुण अंत
या भीषण पुरात सर्वात हृदयद्रावक घटना हेरात प्रांतातील काबकान जिल्ह्यात घडली. मुसळधार पावसामुळे एका घराचे छप्पर कोसळून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्माद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सुरू असलेल्या या पावसाने मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे.
१८०० कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केवळ जीवितहानीच झाली नाही, तर पायाभूत सुविधांचेही कंबरडे मोडले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आणि घरांच्या पडझडीमुळे सुमारे १८०० कुटुंबे बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेकडो जनावरे दगावल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके सध्या दुर्गम भागात सर्वेक्षण करत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुष्काळ संपला, पण संकट गहिरे झाले
विशेष म्हणजे, अफगाणिस्तान दीर्घकाळापासून दुष्काळाचा सामना करत होता. या पावसाने दुष्काळ तर संपवला, पण सोबत मृत्यूचे तांडवही आणले. अफगाणिस्तानमधील बहुतांश घरे ही मातीची बनलेली आहेत, जी अचानक आलेल्या पुराचा आणि पावसाचा मारा सहन करू शकत नाहीत. हवामान बदलाचा फटका अफगाणिस्तानलाही बसत असून, शेजारील भारत आणि पाकिस्तानप्रमाणेच इथेही टोकाचे हवामान पाहायला मिळत आहे.
२०२६ मध्ये मानवी संकटाची टांगती तलवार
संयुक्त राष्ट्राने इशारा दिला आहे की, २०२६ मध्येही अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटांपैकी एक राहील. आधीच युद्ध आणि गरिबीने होरपळलेल्या या देशाला आता निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. संयुक्त राष्ट्राने सुमारे १८ दशलक्ष गरजूंच्या मदतीसाठी १.७ अब्ज डॉलर्सच्या निधीचे आवाहन केले आहे.
सध्या अफगाणिस्तानमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असले, तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेणे हे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान बनले आहे.