‘नाटो’ देशांना हल्ल्यांची भीती; येत्या ४ वर्षात रशिया कोणत्याही देशावर हल्ला करू शकतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:07 IST2025-11-28T10:06:53+5:302025-11-28T10:07:24+5:30
रशियाने युक्रेनच्या अनुषंगाने एखादा शांतता करार केला तरी या देशाचा युरोपसाठी असलेला धोका कमी होणार नाही, असे ‘नाटो’चे सरचिटणीस मार्क रुटे यांनी म्हटले

‘नाटो’ देशांना हल्ल्यांची भीती; येत्या ४ वर्षात रशिया कोणत्याही देशावर हल्ला करू शकतो?
बर्लिन - युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबविण्याबाबत रशिया कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याच्या मन:स्थितीत नाही. याबाबत तयार केलेली शांतताविषयक योजनाही कुचकामी ठरत असल्याने जर्मनी आपल्या संरक्षण खर्चात वाढ करेल, युक्रेनला लष्करी मदत करेल, असे या देशाचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी तेथील संसदेत नमूद केले.
दरम्यान, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडफूल यांनी मंगळवारी इशारा देताना म्हटले आहे की, येत्या चार वर्षांत रशिया कोणत्याही ‘नाटो’ देशावर हल्ला करू शकतो. बर्लिनमध्ये आयोजित परराष्ट्र धोरणविषयक बैठकीत वेडफूल यांनी हा इशारा दिला.
धोका कायम
रशियाने युक्रेनच्या अनुषंगाने एखादा शांतता करार केला तरी या देशाचा युरोपसाठी असलेला धोका कमी होणार नाही, असे ‘नाटो’चे सरचिटणीस मार्क रुटे यांनी म्हटले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करीत दिलेला शांततेचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी मान्य केला; तर रशिया आक्रमक असल्याने या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.
हे सांगितले कारण
रशियाने आपली अर्थव्यवस्था आणि समाजाला अशा पद्धतीने सज्ज केले आहे की, युद्ध कितीही दिवस चालले तरी त्याचा फार गंभीर परिणाम या देशात दिसणार नाही. रशियाची महत्त्वाकांक्षा आता युक्रेनपुरती मर्यादित न राहता ती युरोपातील उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) देशांपर्यंत फैलावली असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्र्यांनी केला.