मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:23 IST2025-07-02T11:23:00+5:302025-07-02T11:23:31+5:30
ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे.

मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
न्यूयॉर्क : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध भडकले असून अमेरिकी सरकारने सबसिडी दिली नाही, तर मस्क यांना कदाचित पुन्हा आपल्या घरी दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे.
या विधेयकामुळे चिडलेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. हा निर्णय रिपब्लिकन पार्टीसाठी राजकीय आत्महत्या करणारा ठरेल, असे मस्क म्हणाले होते. त्यावर ट्रम्प यांनी मस्कना गंभीर इशारा दिला. ट्रम्प यांनी म्हटले की, मी ‘ईव्ही मँडेट’च्या विरोधात होतो आणि निवडणुकीत मदत करण्याआधीच मस्क यांना हे माहिती होते. जगातील सर्वाधिक सबसिडी इलॉन यांना मिळते. सबसिडीशिवाय त्यांना आपले दुकान बंद करावे लागेल आणि पुन्हा आपल्या घरी दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल.
किती सबसिडी मिळते याची होणार चौकशी
मस्क यांच्या कंपन्यांना किती सबसिडी मिळत आहे, याचा तपास डॉजने करावा. डॉजसाठी हे एक चांगले आणि कठीण काम होऊ शकेल व त्यातून मोठा निधीही वाचेल, असे ट्रम्प यांनी म्हटले.
डॉज हा विभाग ट्रम्प यांनीच सुरू केला असून त्याचे नेतृत्व त्यांनी मस्क यांच्याकडेच सोपवले होते. संबंध बिघडल्यानंतर मस्क यांनी त्याचा राजीनामा दिला होता.
राजकीय पक्ष काढण्याचा मस्क यांचा इशारा
दरम्यान, ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफुल बिला’वरून संतापलेल्या इलॉन मस्क यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याचा इशाराही दिला आहे.
मस्क यांनी म्हटले की, हे विक्षिप्त खर्च विधेयक मंजूर झाले, तर पुढच्याच दिवशी ‘अमेरिका पार्टी’ची स्थापना केली जाईल. डेमॉक्रॅट व रिपब्लिकन एकच आहेत. त्यांना पर्याय उभा करण्याची गरज आहे. ज्यायोगे लोकांना आपला खरा आवाज मिळू शकेल.