MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 21:12 IST2025-10-23T21:10:55+5:302025-10-23T21:12:46+5:30
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हायस्पीड रेल्वेने १२ तासांचा प्रवास अवघ्या ४ तासांवर येऊन ठेपेल.

MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
सौदी अरेबिया पैसे आणि तंत्रज्ञानाच्या बळावर एक अत्यंत महत्त्वकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करत आहे. ज्या प्रकल्पाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मोहम्मद बिन सलमानच्या व्हिजन २०३० चा हा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पावर सौदी अरेबिया जवळपास ७ अब्ज डॉलर म्हणजे ५८ हजार कोटी खर्च करणार आहे. हा रेल्वे प्रकल्प अरबी द्वीपकल्पातील प्रवास आणि व्यापाराला पूर्णपणे बदलून टाकेल कारण तो लाल समुद्राला अरबी खाडीशी जोडेल.
काय आहे लँड ब्रिज प्रकल्प?
हा १५०० किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प आहे, जो लाल समुद्राच्या जेद्दा शहराची राजधानी रियादपासून सुरू होऊन अरब खाडीजवळील शहर दम्मासला जोडेल. हा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्या सौदी व्हिजन २०३० चा प्रमुख आधार आहे. हे अरबी वाळवंटातील एक चमत्कार आहे. त्याचा उद्देश प्रमुख लोकसंख्या केंद्रांना जोडणे आणि देशाला जागतिक वाहतूक व्यवस्थेचे केंद्र बनवणे आहे.
१२ तासाचा प्रवास अवघ्या ४ तासांवर
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हायस्पीड रेल्वेने १२ तासांचा प्रवास अवघ्या ४ तासांवर येऊन ठेपेल. रेल्वेच्या गतीमुळे या प्रकल्पाला लँड ब्रिज असं नाव देण्यात आले आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा प्रवासी आणि माल वाहतूक व्यवस्थेला होईल. हे रेल्वे नेटवर्क प्रमुख औद्योगिक शहरे, बंदरे यांनाही जोडेल. ज्यातून व्यापार, लॉजिस्टिक्स क्षेत्राला त्याचा लाभ होईल. या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले असून २०३० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Desert Dream लग्झरी ट्रेन चालवण्याची घोषणा
या प्रकल्पाला सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था बदलणारी शाही योजनाही म्हटलं जात आहे. ज्यात पैसा आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. वाळवंटात लग्झरी ट्रेन धावल्यानंतर त्याची क्षमता पाहून जग हैराण होणार आहे आणि सौदी अरेबियाची वेगळी ओळख निर्माण होईल. या प्रकल्पात केवळ वेगावर लक्ष केंद्रीत केले नसून या ट्रेनच्या शान ए शौकतकडेही विशेष लक्ष दिले आहे. याच रूटवर सौदी सरकारकडून पुढील काळात Desert Dream लग्झरी ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, व्हिजन २०३० पर्यंत सौदी अरेबियाचे लक्ष्य सध्याचे रेल्वे नेटवर्क ५३०० किलोमीटरवरून वाढवून ८ हजार किमी इतके करण्याचे आहे. सौदी रेल्वे कंपनीने २०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या १५ ट्रेनची ऑर्डर दिली आहे.