मंत्र्याला पदावरून काढले अन् लगेच मृतावस्थेत आढळले; भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडले गेले होते नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:44 IST2025-07-08T10:43:24+5:302025-07-08T10:44:05+5:30
स्टारोवॉय यांनी कुर्स्कमधील गव्हर्नरपद सोडल्यानंतर काही महिन्यांनी, युक्रेनियन सैन्याने तेथे हल्ला केला, जो दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील सर्वात मोठा परदेशी हल्ला होता.

मंत्र्याला पदावरून काढले अन् लगेच मृतावस्थेत आढळले; भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडले गेले होते नाव
मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पदावरून हटवल्यानंतर काही तासांत रशियाचे माजी वाहतूकमंत्री मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
५३ वर्षीय रोमन स्टारोवॉय हे २०२४ पासून रशियाचे परिवहनमंत्री होते. त्यांना काढून टाकण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्टारोवॉय बडतर्फीबाबत भाष्य करण्यास नकार दिला. रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५-६ जुलै रोजी झालेल्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे स्टारोवॉय यांना बडतर्फ केले गेले असण्याची शक्यता आहे. युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे देशभरातील सुमारे ३०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
स्टारोवॉय यांना बडतर्फ करण्याचा संबंध कुर्स्कमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांशी देखील जोडला जात आहे. स्टारोवॉय यांनी कुर्स्कमधील गव्हर्नरपद सोडल्यानंतर काही महिन्यांनी, युक्रेनियन सैन्याने तेथे हल्ला केला, जो दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील सर्वात मोठा परदेशी हल्ला होता.