अमेरिका हल्ल्याच्या तयारीत असताना इराणमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; अणूप्रकल्पाच्या भागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:11 IST2026-02-24T14:11:14+5:302026-02-24T14:11:44+5:30
इराणच्या इस्फहान प्रांतात आज सकाळी एका लष्करी हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. हे हेलिकॉप्टर इस्फहानमधील 'दोरचेह' भागातील एका घाऊक फळ ...

अमेरिका हल्ल्याच्या तयारीत असताना इराणमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; अणूप्रकल्पाच्या भागात खळबळ
इराणच्या इस्फहान प्रांतात आज सकाळी एका लष्करी हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. हे हेलिकॉप्टर इस्फहानमधील 'दोरचेह' भागातील एका घाऊक फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कोसळले. या अपघातात पायलट आणि को-पायलटसह एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जमिनीवर असलेल्या दोन व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
इराणी लष्कराचे हे हेलिकॉप्टर सराव उड्डाणावर असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे मार्केटच्या आवारात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच मोठा स्फोट होऊन आग लागली. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये मार्केट परिसरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा निघताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
इस्फहान हा प्रांत इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण येथे अनेक लष्करी तळ आणि अणूप्रकल्प आहेत. त्यामुळे या परिसरात लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याआधीही इराणमध्ये जुन्या विमानांच्या सुट्या भागांच्या कमतरतेमुळे असे अपघात घडले आहेत.
तणावाच्या छायेत अपघात
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असली तरी, प्राथमिक तपासणीत हा केवळ एक तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणचे लष्कर या अपघाताचा सखोल तपास करत आहे.