युद्ध आणखी भडकणार? मध्य पूर्वेतील तणावात रशियाची एन्ट्री; इराणला सोपवली अत्यंत सीक्रेट माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 08:28 IST2026-03-07T08:27:03+5:302026-03-07T08:28:17+5:30
युक्रेनविरुद्धच्या चार वर्षांच्या युद्धात वापरण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची नितांत गरज असल्याने रशियाने इराणशी आपले संबंध मजबूत केले आहेत.

युद्ध आणखी भडकणार? मध्य पूर्वेतील तणावात रशियाची एन्ट्री; इराणला सोपवली अत्यंत सीक्रेट माहिती
तेहरान - अमेरिका आणि इराण युद्धापासून अंतर राखलेला रशिया अखेर मित्राच्या मदतीसाठी पुढे आला आहे. रशियाने इराणला अशी माहिती पुरवली आहे ज्यामुळे इराणला अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्यासाठी मदत मिळू शकते. जर असे झाले तर इराण त्यांच्या हल्ल्यातून अमेरिका आणि इस्रायलला अधिक नुकसान पोहचवू शकते. मात्र रशियाच्या या मदतीची भनक अमेरिकेलाही लागल्याचे पुढे आले आहे.
माहितीनुसार, रशियाकडून इराणला सीक्रेट माहिती पुरवण्यात येत आहे. त्यातून इराणला अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्यासाठी फायदा होऊ शकतो. या माहितीच्या आधारे इराणला प्रादेशिक क्षेत्रात अमेरिकन युद्धनौका, विमाने आणि इतर संपत्तीवर हल्ला करण्यासाठी मदत मिळू शकते अशी माहिती २ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एपी न्यूजने दिली आहे. अमेरिका इराण आणि इस्रायलच्या या युद्धात रशिया सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय हे याचे पहिले संकेत आहेत.
युक्रेनविरुद्धच्या चार वर्षांच्या युद्धात वापरण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची नितांत गरज असल्याने रशियाने इराणशी आपले संबंध मजबूत केले आहेत. तेहरान त्याच्या अणुकार्यक्रमामुळे आणि हिजबुल्लाह, हमास, हुती सारख्या बंडखोर गटांना पाठिंबा दिल्यामुळे वर्षानुवर्षे एकटे पडले आहे. त्यामुळे रशियाचा पाठिंबा हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा फायदा असेल. इतकेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी बोलणे केले. त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू आणि हल्ल्यात मारलेले लोकांबद्दल शोक व्यक्त केला.
अमेरिका इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाकडून पहिल्यांदा इराणला फोन कॉल गेला. इराण किंवा मध्य पूर्वेशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी बळाचा वापर टाळून शत्रुत्व तात्काळ संपवण्यावर त्यांनी जोर दिला आणि राजनैतिक मार्ग काढण्याचा पुतिन यांनी अधोरेखित केले. रशियाकडून इराणला सैन्य हालचालींबाबत माहिती दिल्याच्या घटनेनंतर अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. इराणमधील सैन्य कारवाईवर काही फरक पडणार नाही कारण आम्ही पूर्णत: त्यांना संपवणार आहोत. आम्ही सैन्य अभियान पूर्ण करत आहोत आणि हे सुरूच राहील असं अमेरिकेने सांगितले.
दरम्यान, इस्रायल आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये अमेरिकन सैन्य तळांवर इराण सातत्याने हल्ला करत आहे. इराणने इस्रायलसह १२ देशांविरोधात हल्ला केला आहे. त्यात UAE, कतार, बहरीन, जॉर्डन, इराक, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, सायप्रस, सीरिया आणि अझरबैजान यांचा समावेश आहे. इराणने खोर्रमशहर ४, खेबर आणि फतेह मिसाइलचा हल्ल्यासाठी वापर केला. इस्रायलवर इराणने अनेक बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. ज्यात क्लस्टर बॉम्बचाही समावेश आहे.