Middle East Conflict: हुथी-हिजबुल्लाहच्या एन्ट्रीनं जगावर अणुयुद्धाचं संकट; मध्य पूर्वेतील युद्ध आणखी भडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:05 IST2026-03-28T18:04:25+5:302026-03-28T18:05:28+5:30
Middle East War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे.

Middle East Conflict: हुथी-हिजबुल्लाहच्या एन्ट्रीनं जगावर अणुयुद्धाचं संकट; मध्य पूर्वेतील युद्ध आणखी भडकणार
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्युत्तर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या युद्धात आता येमेनमधील 'हुथी' बंडखोर आणि लेबनॉनमधील 'हिज्बुल्ला' या दोन्ही संघटनांनी उडी घेतल्याने मध्य-पूर्वेतील वातावरण अधिकच तापले आहे.
अण्वस्त्र युद्धाचा धोका वाढला?
इराणमधील धार्मिक नेत्यांकडून आता अण्वस्त्रे बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इराणने आधीच अण्वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमच्या संवर्धनाची पातळी वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर, इस्रायलने शुक्रवारी इराणच्या 'यज्द' येथील युरेनियम प्रोसेसिंग प्लांटवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, "आम्ही मध्य-पूर्वेतील अण्वस्त्र धोक्यांना संपवत आहोत. माझ्या नेतृत्वाखाली अमेरिका या कट्टरपंथी राजवटीचा धोका 'ऑपरेशन एपिक फ्युरी'द्वारे नष्ट करत आहे. इराण गेल्या ४७ वर्षांपासून या भागात दहशत माजवत होता, पण आता तो बॅकफूटवर आहे."
हुथी आणि हिज्बुल्लाची भूमिका
येमेनच्या हुथी बंडखोरांनी प्रथमच इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने अरब देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर, हिज्बुल्लाने कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची घोषणा केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने असा दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे एफ-१८ लढाऊ विमान पाडले आहे, ज्यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे.
युद्ध पेटण्याची शक्यता
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी असा दावा केला आहे की, हे युद्ध येत्या काही आठवड्यांत संपू शकते. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेने इराणची केलेली नाकेबंदी आणि सातत्याने होणारे हल्ले पाहता, हे युद्ध शांत होण्याऐवजी संपूर्ण जगाला वेढणाऱ्या 'अण्वस्त्र संघर्षात' रूपांतरित होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.