मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:51 IST2026-04-01T20:49:40+5:302026-04-01T20:51:10+5:30
Drone Attack on Amazon Data Center: अमेरिका- इस्रायल यांच्यासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्यानंतर बहरीनमधील ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवजवळ ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली.

मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट!
मध्य पूर्वेतील संघर्ष पेटल्याने जगासमोर नवे संकट उभे राहिले आहे. अमेरिका- इस्रायल यांच्यासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्यानंतर बहरीनमधील ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवजवळ ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यांच्या तीव्रतेमुळे आणि आजूबाजुच्या परिस्थितीमुळे डेटा सेंटरच्या कार्यावर गंभीर परिणाम झाला आहे. यासंदर्भात फायनान्शियल टाइम्सने वृत्त दिले.
या हल्ल्यानंतर ॲमेझॉनने तत्काळ पावले उचलत आपल्या क्लाउड ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली. ड्रोन हल्ल्यांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डेटा सेंटरच्या सेवांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संभाव्य मोठा व्यत्यय टाळण्यासाठी ग्राहकांनी आपला डेटा आणि वर्कलोड्स इतर सुरक्षित क्षेत्रांतील सर्व्हरवर ट्रान्सफर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणने तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर झालेली ही घटना जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे सायबर सुरक्षा आणि भौतिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जगासमोर नवे संकट
इराणच्या या भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील संघर्षाची व्याप्ती आता केवळ लष्करी तळांपुरती मर्यादित न राहता, ती जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचली आहे. ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीला लक्ष्य केल्यामुळे जागतिक बाजारपेठेवर आणि डेटा सुरक्षेवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.