अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:49 IST2025-11-02T11:45:03+5:302025-11-02T11:49:48+5:30
मेक्सिकोच्या सोनोरामधील हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - Reuters
मेक्सिकोच्या सोनोरामधील हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये अनेक लहान मुलांसह किमान २३ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशभरात ‘डे ऑफ द डेड’ साजरा केला जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
सोनारा राज्याचे अटॉर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीनंतर दुकानात धूर झाला. विषारी गॅस वेगाने पसरल्याने बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीमने मृतदेहांची तपासणी सुरू केली आहे.
स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, स्फोट किंवा आगीमागे इलेक्ट्रिकल फॉल्ट हे कारण असल्याचं म्हटलं जातं. शहराच्या अग्निशमन प्रमुखांनी सांगितलं की, तपास सुरू आहे. हर्मोसिलो नगरपालिकेने स्पष्ट केलं की, हा दहशतवादी हल्ला नव्हता.
सोनाराचे गव्हर्नर अल्फोन्सो दुराझो म्हणाले, "दुर्घटनेचे कारण निश्चित करण्यासाठी मी पारदर्शक आणि सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ही एक अतिशय दुःखद घटना आहे, विशेषतः मृतांमध्ये लहान मुलं असल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे."
सोनारा रेड क्रॉसने दिलेल्या माहितीनुसार, ४० पथकं आणि १० रुग्णवाहिका बचाव कार्यात सहभागी होत्या. सहा वेळा जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. अग्निशमन विभागाने सांगितलं की, आग आता आटोक्यात आली आहे, परंतु ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.