इंडोनेशियातील वृद्धाश्रमात भीषण आग, 16 वृद्धांचा होरपळून मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:55 IST2025-12-29T15:54:35+5:302025-12-29T15:55:20+5:30
या दुर्घटनेत इतर 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

इंडोनेशियातील वृद्धाश्रमात भीषण आग, 16 वृद्धांचा होरपळून मृत्यू...
इंडोनेशिया / मानाडो : इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांतातील मानाडो शहरात असलेल्या एका रिटायरमेंट होमला (वृद्धाश्रम) रविवारी सायंकाळी भीषण आग लागून 16 वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व वृद्ध झोपेत असताना आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर सुलावेसी पोलिसांचे प्रवक्ते अलमस्याह हसिबुआन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी 15 वृद्धांचे मृतदेह होरपळले, तर एका वृद्धाचा मृतदेह पूर्णतः सुरक्षित अवस्थेत आढळून आला. या दुर्घटनेत इतर 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मानाडोमधील दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने आपत्कालीन सेवांना माहिती दिली. त्यानंतर सहा अग्निशमन वाहनांच्या मदतीने दोन तासांहून अधिक काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.
टीव्ही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये आकाशात उडणाऱ्या ज्वाळा, दाट धूर, नागरिकांची धावपळ आणि रिटायरमेंट होमबाहेर ठेवलेल्या बॉडी बॅग्स दिसून आल्या. काही शेजाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वृद्धांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.
प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी नंतर सांगितले की आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. मृतांचे मृतदेह ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. ही घटना वृद्धांसाठी असलेल्या संस्थांमधील अग्निसुरक्षा आणि देखरेखीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.