इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:18 IST2025-04-26T16:42:03+5:302025-04-26T17:18:56+5:30
इराणच्या राजाई बंदरात झालेल्या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
Iran Massive Explosion:इराणच्या बंदर अब्बास शहरात झालेल्या स्फोटामुळे हाहाकार उडाला आहे. बंदर अब्बास शहरात शनिवारी मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात ४०६ जण जखमी झाले आहेत. अनेक जखमींना होर्मोज्गान येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सिना कंटेनर यार्डमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती स्फोट इराणी अधिकाऱ्यांनी दिली. हे यार्ड पोर्ट्स अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशनशी संबधित आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मेहरदाद हसनजादेह म्हणाले की, हा स्फोट विनाशकारी होता.
ओमानमध्ये इराणने अमेरिकेसोबत आण्विक चर्चेचा तिसरा टप्पा सुरू केला असताना हा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात ४०६ लोक जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बचाव कर्मचारी घटनास्थळावर लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. राजाई बंदरात असलेल्या कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. या कंटेनरमध्ये तेल आणि इतर पेट्रोकेमिकल वस्तू नेल्या जातात. त्यामुळे स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचे म्हटलं जात आहे.
या भीषण स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा उडाल्या. स्फोटामुळे बंदराशेजारून जाणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या असून सगळीकडे धुराचे लोट पसरले. या भीषण स्फोटानंतर उडालेल्या हाहाकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावार व्हायरल होत आहेत. या स्फोटामुळे अनेक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर धुराचे ढग तयार झाल्याचे दिसून आले.
"शाहीद राजाई बंदर घाट परिसरात साठवलेल्या अनेक कंटेनरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. आम्ही सध्या जखमींना बाहेर काढून वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवत आहोत," असे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. आग विझविण्यासाठी बंदरातील कामकाज बंद करण्यात आले आहे. बंदरातील कर्मचाऱ्यांची संख्या पाहता या घटनेत अनेक लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.