"मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत मागे पडतोय"; जर्मनीतील BMW प्लांटमधून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:09 IST2025-12-17T15:09:07+5:302025-12-17T15:09:29+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधींनी जर्मनीतील बीएमडब्लू प्लांटची पाहणी केल्यानंतर भारतीय इंजिनिअरिंगचे कौतुक करत केंद्र सरकारवर निशाणा.

"मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत मागे पडतोय"; जर्मनीतील BMW प्लांटमधून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
Rahul Gandhi in Germany: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी म्युनिक येथील प्रसिद्ध बीएमडब्ल्यू प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी जागतिक दर्जाच्या मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाची पाहणी केली. विशेष म्हणजे, या जागतिक प्लॅटफॉर्मवर भारतीय कंपनी टीवीएस आणि बीएमडब्ल्यू यांच्या भागीदारीतून तयार झालेली मोटारसायकल पाहून त्यांनी भारतीय इंजिनिअरिंगचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले.
राहुल गांधींनी प्लांटमध्ये टीवीएस आणि बीएमडब्ल्यू च्या भागीदारीतून विकसित केलेली ४५० सीसी मोटारसायकल पाहिली. "जागतिक स्तरावर भारतीय इंजिनिअरिंगचे असे काम पाहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे," असे राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. प्लांटच्या भेटीनंतर बोलताना राहुल गांधींनी भारतातील उत्पादन क्षेत्राच्या स्थितीवर भाष्य केले. "मॅन्युफॅक्चरिंग हा कोणत्याही मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असतो. दुर्दैवाने भारतात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात घट होत आहे," अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
"भारताला उत्पादन सुरू करण्याची गरज आहे. कोणत्याही देशाच्या यशाची गुरुकिल्ली उत्पादनात दडलेली असते. आपले मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र जे वाढायला हवे होते, ते प्रत्यक्षात घटत चालले आहे," असं राहुल गांधी म्हणाले. देशाचा आर्थिक विकास वेगवान करण्यासाठी आपल्याला उत्पादनावर भर द्यावा लागेल. दर्जेदार मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार करून मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Had the chance to experience BMW’s world in Munich, Germany with a guided tour of BMW Welt and the BMW Plant - an incredible look at world-class manufacturing up close.
— Indian Overseas Congress (@INCOverseas) December 17, 2025
A highlight was seeing TVS’s 450cc motorcycle, developed in partnership with BMW. Proud moment to see Indian… pic.twitter.com/xF0tVVopnt
दौऱ्याचा राजकीय आणि जागतिक हेतू
राहुल गांधींचा हा दौरा केवळ उद्योगांना भेट देण्यापुरता मर्यादित नसून, तो जागतिक स्तरावर पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचा एक भाग आहे. राहुल गांधी १७ डिसेंबर रोजी बर्लिनमध्ये 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'च्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. युरोपमधील विविध देशांतील आयओसी अध्यक्ष आणि अनिवासी भारतीयांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत. यामध्ये भारतापुढील आव्हाने आणि काँग्रेसची रणनीती यावर मंथन होईल.
TVS आणि BMW भागीदारी
राहुल गांधींनी ज्या भागीदारीचे कौतुक केले, ती २०१३ मध्ये सुरू झाली होती. यामुळे ५०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटारसायकल निर्मितीत भारताने जगात आपले नाव कमावले आहे. आतापर्यंत या युनिटमधून २,००,००० पेक्षा जास्त मोटारसायकलींचे उत्पादन झाले असून, हे भारत-जर्मनी सहकार्याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.