पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:12 IST2025-07-27T06:08:54+5:302025-07-27T06:12:18+5:30
भारताकडून मालदीवला सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष लतीफ यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
माले :मालदीव-भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष उझ हुसैन मोहम्मद लतीफ यांच्यासह त्या देशातील अन्य मान्यवर नेत्यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते व लतीफ यांच्यात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली. या संदर्भात मोदी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारत-मालदीवमध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये उत्तम सहकार्य निर्माण झाले आहे. मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्या देशाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताकडून मालदीवला सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्या देशाचे उपराष्ट्राध्यक्ष लतीफ यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणात मालदीव महत्त्वाचा घटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांचीही भेट घेतली. मोदी म्हणाले की, भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणामध्ये मालदीव हा महत्त्वाचा घटक आहे. मालदीवचा विकास व त्याच्या क्षमता वाढविण्यासाठी भारताने नेहमीच संपूर्ण सहकार्य देऊ केले आहे. (वृत्तसंस्था)