नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:31 IST2025-09-11T16:31:07+5:302025-09-11T16:31:39+5:30
नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी रोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह, सुशीला कार्की यांच्या नावांनंतर आता ५४ वर्षीय कुलमान घिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आले आहे.

नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
भारताचा शेजारी देश नेपाळ गेल्या काही दिवसांपासून जेन-झी आंदोलनामुळे होरपळून निघाला आहे. आता या आंदोलनाची धग कमी झाली असली, तरी अद्याप देशातील तणाव कायम आहे. जेन-झी आंदोलक आता देशात नवं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, नेपाळच्यापंतप्रधान पदासाठी रोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह, सुशीला कार्की यांच्या नावांनंतर आता ५४ वर्षीय कुलमान घिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. एकीकडे बालेन शाह यांनी या शर्यतीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. तर, दुसरीकडे वयोमानामुळे सुशीला कार्की या शर्यतीत मागे पडल्या आहेत.
कुलमान घिसिंग हे वीज महामंडळाचे माजी प्रमुख होते. नेपाळमधील वीज व्यवस्था सुधारण्याचे श्रेय कुलमान यांना दिले जाते. त्यांच्या नेतृत्वातच नेपाळ वीजतुटवडा कमी झाला. त्यांच्या याच कामामुळे जेन-झीचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आता घिसिंग यांनी एक असे सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे, ज्यात स्वच्छ प्रतिमा असणारे नेते आणि जेन-झी तरुणांना देखील सामील केलेले असेल. यामुळे कुलमान घिसिंग जेन-झीचे आवडते बनले आहेत आणि देशाचे नेतृत्व त्यांच्या हातात सोपवण्याची मागणी होत आहे.
या आधी नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव सगळ्यात पुढे होते. मात्र, आंदोलनकर्त्यांचा एक गट त्यांच्या निवडीशी सहमत नाही. सुशीला कार्की यांचे वय ७३ वर्षे असल्याने, नेपाळचे नेतृत्व सांभाळण्यासाठी त्या फारच वयस्कर असल्याचे म्हटले जात आहे. यासोबत, संविधानानुसार माजी न्यायाधीशांना पंतप्रधानपदी विराजमान होता येत नाही. त्यामुळेच आता कुलमान घिसिंग यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही.
कोण आहेत कुलमान घिसिंग?
२५ नोव्हेंबर १९७० रोजी रामेछाप येथील बेथान येथे जन्मलेल्या कुलमान घिसिंग यांनी भारतातील जमशेदपूर येथील रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नेपाळमधील पुलचोक इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतले. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी एमबीएचे शिक्षण घेतले. कुलमन घिसिंग हे नेपाळच्या वीज मंडळाचे माजी प्रमुख होते. त्यांनी १९९४ मध्ये एनईएमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. काठमांडूतील दीर्घकाळ चालणारी वीज कपात संपवल्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले आहे.