होर्मुझ बंद ठेवा, जगावर दबाव वाढवा; इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 05:30 IST2026-03-13T05:29:57+5:302026-03-13T05:30:18+5:30

आमच्या बेटांवर हल्ला कराल तर रक्ताचा सडा पाडू, इराणचा इशारा

Keep Hormuz closed, increase pressure on the world; Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei's new strategy | होर्मुझ बंद ठेवा, जगावर दबाव वाढवा; इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची नवी रणनीती

होर्मुझ बंद ठेवा, जगावर दबाव वाढवा; इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची नवी रणनीती

दुबई : होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय दबावाचे साधन म्हणून वापरला पाहिजे, असे थेट विधान इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई (वय ५६) यांनी गुरुवारी केले. त्यांनी इराणकडून अरब देशांवर हल्ले सुरूच राहतील, असाही इशारा दिला.  इराणच्या आधिपत्याखाली असलेल्या एकाही बेटावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण झाल्यास पर्शियाच्या आखातात आक्रमकांच्या रक्ताचा सडा पडेल, अशी गर्भित धमकी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी गुरुवारी दिली. 

इराणच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच खामेनेईंनी राष्ट्रीय टीव्हीवरून हे विधान केले. खामेनेईंचे हे विधान एका निवेदकाने वाचून दाखवले. यात खामेनेई स्वतः पडद्यावर दिसले नाहीत. आमच्यावर भविष्यात हल्ले होणार नाहीत, याची हमी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असाही इशारा खामेनेईंनी दिला. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मोज्तबा हे जखमी झाल्याचा इस्रायलच्या गुप्तचर खात्याचा अंदाज आहे.

शहिदांचा बदला घेऊ

खामेनेई यांनी युद्धात, तसेच एका शाळेवरील हल्ल्यात ठार झालेल्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यांनी अमेरिकेचा उल्लेख करत इराण आपल्या शत्रूकडून भरपाई वसूल करील, असेही विधान केले. जर अमेरिकेने भरपाई देण्यास नकार दिला गेला तर इराण त्यांच्या मालमत्तेतून ती वसूल करेल किंवा त्यांच्या मालमत्तांचा विध्वंस करेल, असा इशारा त्यांनी दिला.

जहाजांवर हल्ले, खलाशी बेपत्ता

दक्षिण इराकमध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू जहाजावर खोर अल-जुबैर बंदराजवळ हल्ला झाला. ओमानच्या किनाऱ्याजवळ थायलंडच्या ‘मयुरी नारी’ या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या जहाजावरील २० सदस्यांना वाचविण्यात आले. पण, तीन खलाशी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. 

संयुक्त राष्ट्रांत मांडला इराण विरोधात ठराव

संयुक्त राष्ट्रे : आखाती देश आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या भीषण हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला भारताने सहप्रस्तावक म्हणून पाठिंबा दिला. या ठरावात इराणने सर्व हल्ले तत्काळ थांबवावेत तसेच हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या धमक्यांचाही निषेध करण्यात आला. हा ठराव बुधवारी बहरिनने मांडला होता. तो अमेरिकेच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने १३ मतांनी मंजूर केला. ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही. मात्र, स्थायी सदस्य असलेल्या चीन आणि रशियाने मतदानात भाग घेतला नाही. या ठरावाला भारतासह १३५ देशांनी सहप्रायोजक म्हणून पाठिंबा दिला. 

अमेरिकेची प्रतिक्रिया

संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे प्रतिनिधी माइक वॉल्ट्झ यांनी हा ठराव म्हणजे इराण सरकारच्या क्रूरतेचा निषेध करणारा आखाती देशांचा स्पष्ट संदेश आहे, अशी टीका केली. 

अनेक देशांचा पाठिंबा

या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बांगलादेश, भूतान, कॅनडा, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, जपान, कुवेत, मलेशिया, मालदीव, म्यानमार, न्यूझीलंड, नॉर्वे, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्पेन, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका, येमेन आणि झांबिया यांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांतील इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी हा ठराव अन्यायकारक व बेकायदा असल्याची टीका केली. इराणचे १,३४८हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. 

तेलवाहू जहाजावर हल्ला; १५ खलाशांचे भारताने वाचवले प्राण

बगदाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराकच्या बसरा किनाऱ्याजवळ कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर उर्वरित १५ भारतीय खलाशांना भारतीय दूतावासाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. 

इराकच्या बसरा किनारपट्टीजवळ ‘सीफेस विष्णू’ या तेलवाहू जहाजावर ११ मार्च रोजी भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाला आपला जीव गमवावा लागला आहे, तर भारतीय दूतावासाने तातडीने हालचाली करत उर्वरित १५ भारतीय खलाशांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

नेमकी घटना काय? 

मार्शल बेटांचा ध्वज असलेले आणि अमेरिकन मालकीचे हे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज इराकच्या बसरा किनारपट्टीवरून जात असताना हा हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, इराणच्या एका ‘आत्मघाती बोट’ने हे जहाज उडवण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात जहाजावरील एका भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता, बगदादमधील भारतीय दूतावास आधीच सतर्क होते. घटनेची माहिती मिळताच दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य राबवले.

दक्षिण लेबनान तत्काळ रिकामा करा : इस्रायल 

इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमधील एका मोठ्या भूभागातील रहिवाशांना तातडीने घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे. हिजबुल्लाच्या तळांविरुद्ध 'ठोस आणि निर्णायक' कारवाई करण्यासाठी हा भाग रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलीने सोशल मीडियाद्वारे लेबनानी नागरिकांना 'जहरानी' नदीच्या उत्तर भागात स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान सौदीला रवाना

इस्लामाबाद : आखातातील वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ गुरुवारी सौदी अरेबियाला रवाना झाले. सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण करारामुळे या संघर्षात पाकिस्तानची भूमिका काय असेल, याकडे विशेष लक्ष लागले आहे. शरीफ यांचा हा दौरा सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावर होत आहे. या भेटीत दोन्ही नेते आखात प्रदेशातील तणावावर चर्चा करतील. 

आखाती देशांतील इंधन साठ्यांवर इराणचे हल्ले

दुबई : इराणने बुधवारी उशिरा आणि गुरुवारी पहाटे आखात प्रदेशात ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू ठेवत दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले तसेच अनेक व्यापारी व तेलवाहक जहाजे व इंधन साठ्यांवरही हल्ले केले. 

बहरीनची राजधानी मनामाच्या ईशान्येकडील मुहर्रक प्रांतातील एका तेलसाठ्याचा केंद्रावर इराणने हल्ले केले. तर ओमानमधील सलालाह बंदरातील इंधन साठवण टाक्यांवरही हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. 

जेरुसलेममध्ये स्फोट 

गुरुवारी मध्यरात्रीनंतर जेरुसलेम आणि इस्रायलच्या काही भागांत सायरन वाजले आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. 

‘हाय रिस्क झोन’जाहीर

मध्यपूर्वेतील संघर्षाचा वाढता धोका पाहता भारताच्या जहाज वाहतूक महासंचालनालयाने पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानचे आखात या भागांना ‘हाय रिस्क झोन’ म्हणून घोषित केले आहे. भारतीय जहाजांना चोवीस तास पाळत ठेवण्याचे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, आखाती देशांमध्ये जवळपास १ कोटी भारतीय राहतात. त्यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या भागातील विविध देशांच्या प्रमुखांशी सतत संपर्कात आहेत.

Web Title : ईरान की होर्मुज जलडमरूमध्य को बंद करने की धमकी, क्षेत्रीय तनाव बढ़ा।

Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को बंद करने की धमकी दी, जिससे क्षेत्रीय तनाव बढ़ गया। जहाजों, तेल सुविधाओं पर हमले। अमेरिका ने ईरान की निंदा की, खाड़ी देशों का समर्थन किया। भारत ने नागरिकों की सुरक्षा को प्राथमिकता दी।

Web Title : Iran threatens Hormuz Strait closure amid regional tensions, attacks escalate.

Web Summary : Iran warns of Hormuz Strait closure, sparking regional tensions. Attacks target ships, oil facilities. US condemns Iran, backs Gulf states. India prioritizes citizen safety.