'जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदाचा राजीनामा द्या'! कॅनडामध्ये मागणी वाढू लागली,पहिल्यांदाच अशी वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:00 IST2024-12-17T11:51:17+5:302024-12-17T12:00:29+5:30
कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या पंतप्रधानपदाच्या राजिनाम्याची मागणी वाढली आहे.

'जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदाचा राजीनामा द्या'! कॅनडामध्ये मागणी वाढू लागली,पहिल्यांदाच अशी वेळ आली
कॅनडामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच जस्टिन ट्रुडो सरकार अडचणीत सापडले आहे. त्यांच्या सरकारचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी जस्टिन ट्रुडो यांना कमकुवत संबोधल्याचा आरोपही केला. फ्रीलँड हे ट्रुडोच्या जवळचे मानले जात होते आणि पंतप्रधानांनी विश्वास ठेवलेल्या काही मंत्र्यांपैकी ते होते. यामुळे आता त्यांच्या राजीनाम्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप
जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कसोटी मानली जात आहे. ते आता किती काळ पंतप्रधानपदी राहू शकणार आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह यांनीही त्यांना पद सोडण्याची मागणी केली आहे.
जस्टिन ट्रुडो पुढच्या निवडणुकीतही लिबरल पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगत आहेत. पण पक्षात असे अनेक नेते आहेत ज्यांना जस्टिन ट्रुडो यांनी यावेळी नेतृत्व करू नये असे वाटत आहे. त्यांना सलग चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचे आहे, पण पक्षांतर्गत निर्माण झालेल्या आव्हानांमुळे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता जस्टिन ट्रुडो यांच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीवरे म्हणाले की, सरकार आता आपले नियंत्रण गमावत आहे. ही त्यांची सर्वात वाईट वेळ आहे. ते म्हणाले की, जस्टिन ट्रुडो यांच्या हातातून सरकार निसटत आहे, पण तरीही त्यांना कायम राहायचे आहे. ही परिस्थिती अशा वेळी आहे जेव्हा अमेरिका आमच्यावर २५% अतिरिक्त शुल्क लादत आहे. अशा स्थितीत कमकुवत सरकार देशाची धोरणे कशी पुढे नेणार?, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुढील वर्षी ऑक्टोबरपूर्वी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लिबरल पक्षाला सत्तेत राहण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा आवश्यक आहे. कारण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यास कॅनडात कधीही निवडणुका होऊ शकतात.