Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:11 IST2025-05-19T09:08:19+5:302025-05-19T09:11:04+5:30
जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे.

Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
Jo Biden Cancer News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोग झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. या संदर्भात त्यांच्या कार्यालयातून एक अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलं आहे. जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे. चिंताजनक बाब म्हणजे हा कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पोहोचला आहे. ही बातमी समोर येताच त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांचा सल्ला घेतला. जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. जो बायडेन यांना कर्करोगाची लक्षणे दिसल्यानंतर केलेल्या तपासणीतून त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे.
Personal Office of Former US President Joe Biden issues a statement: Last week, Former President Joe Biden was seen for a new finding of a prostate nodule after experiencing increasing urinary symptoms. On Friday, he was diagnosed with prostate cancer, characterized by a Gleason… pic.twitter.com/yOwB8QDKfK
— ANI (@ANI) May 18, 2025
काय आहे प्रोटेस्ट कॅन्सर?
जो बायडेन यांना झालेला कर्करोग खूप धोकादायक आहे. प्रोटेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये याची सुरुवात होते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशयासमोर स्थित असते , जी वीर्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जो बायडेन यांचा कर्करोग अतिशय आक्रमक आहे, म्हणून तो हाडांमध्ये पसरला आहे. प्रोस्टेट कर्करोग हळूहळू वाढू शकतो , परंतु काही प्रकरणांमध्ये तो आक्रमक होऊ शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये,हाडे किंवा लिम्फ नॉड्समध्ये पसरू शकतो.
आधीही झालेला कर्करोग
याआधी २०२३ मध्ये बायडेन यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. यांच्या छातीवर बेसल सेल कार्सिनोमा, जो त्वचेचा एक सामान्य प्रकारचा कर्करोग आहे, त्याचे निदान झाले होते. फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया करून, यावर उपचार करण्यात आले होते. जो बायडेन यांनी २०२०मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता आणि गेल्या वर्षी ते पुन्हा निवडणूक लढवू इच्छित होते. परंतु त्यांच्या वय आणि मानसिक स्थितीबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे त्यांनी या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.