'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 23:12 IST2026-02-21T23:09:35+5:302026-02-21T23:12:27+5:30

Javed Akhtar on Taliban New law of domestic violence: तालिबानच्या नव्या कायद्यानुसार घरगुती हिंसाचाराला कायदेशीर मान्यता

javed akhtar lash out taliban law allowing domestic violence husband beating wife | 'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर..

'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर..

Javed Akhtar on Taliban New law of domestic violence: अफगाणिस्तानातील महिलांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या तालिबानने एक नवीन कायदा लागू केला आहे, जो महिलांवरील घरगुती हिंसाचाराला कायदेशीररित्या मान्यता देतो. या कायद्यानुसार, जोवर हाडं मोडत नाहीत किंवा त्वचेवर जखमा होत नाहीत, तोपर्यंत पती आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करू शकतो. याचाच अर्थ असा की जर हाडं मोडली नाहीत तर केलेली मारहाण चुकीची नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या स्वाक्षरीने ही दंडसंहिता लागू करण्यात आली आहे. याविरोधात बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दांत मत मांडले आहे.

तालिबानी म्हणजे जगाची घाण!

"तालिबान सरकारने पत्नीला मारहाण करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे, जोवर तिची हाडं मोडत नाहीत. जर पत्नी पतीच्या परवानगीशिवाय तिच्या माहेरी गेली, तर तिला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा होईल (असाही कायदा झाला आहे). मी भारतातील मुफ्ती आणि मुल्लांना विनंती करतो की, त्यांनी याचा बिनशर्त निषेध करावा. कारण हे सर्व त्यांच्या धर्माच्या नावाखाली केले जात आहे. राजकीयदृष्ट्या सोयीस्कर काहीही असो, या निर्दयी तालिबान्यांना आपण कोणतीही विश्वासार्हता किंवा आदर देऊ नये. कारण ते जगातील घाण आहेत," अशा खरमरीत शब्दांत जावेद अख्तर यांनी या नव्या कायद्याचा निषेध केला आहे.

तालिबानचा नवा कायदा काय?

जर पतीने बळजबरी केली आणि पत्नीच्या शरीरावर दिसू शकणाऱ्या जखमा किंवा हाडे मोडली तर पतीला फक्त १५ दिवस तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय, जर स्त्री न्यायालयात हिंसाचार सिद्ध करू शकली तरच शिक्षा दिली जाईल. महिलेने पूर्णपणे झाकलेले राहावे आणि न्यायाधीशांना तिच्या जखमा दाखवाव्यात. तिच्यासोबत तिचा पती किंवा पुरुष पालक देखील न्यायालयात असायला हवा. तसेच जर विवाहित महिला तिच्या पतीच्या परवानगीशिवाय तिच्या नातेवाईकांना भेटायला गेली, तर तिला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Web Title: javed akhtar lash out taliban law allowing domestic violence husband beating wife