इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 23:51 IST2025-11-23T23:48:44+5:302025-11-23T23:51:15+5:30
इस्रायलने इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा टॉप कमांडर आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ हेथम तबतबाई याला ठार केले आहे.

इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
लेबनॉनची राजधानी बेरूत येथे महिन्याभराच्या शांततेनंतर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मोठी आणि निर्णायक यश मिळवले आहे. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा टॉप कमांडर आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ हेथम तबतबाई याला ठार केले आहे. गेल्या जून महिन्यानंतर प्रथमच बेरूत शहराला लक्ष्य करण्यात आले असून, या कारवाईमुळे इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात व्यापक संघर्ष पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.
इस्रायलचा थेट दावा
इस्रायली सैन्याने एका निवेदनात सांगितले की, "आम्ही बेरूतच्या परिसरात हल्ला करून हिजबुल्लाहच्या चीफ ऑफ जनरल स्टाफ असलेला अतिरेकी हेथम अली तबतबाई याला संपवले आहे." लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात झालेल्या या हल्ल्यात काही लोक ठार झाले असून, २१ जण जखमी झाले आहेत.
अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेला कमांडर
२०१६ मध्ये अमेरिकेने तबतबाई याला दहशतवादी घोषित केले होते. तो एक मिलिटरी लीडर होता, ज्याने सीरिया आणि येमेनमध्ये हिजबुल्लाहच्या विशेष दलांचे नेतृत्व केले होते. अमेरिकेने त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास ५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.
अकीलचा वारसदार
सप्टेंबर २०२४ मध्ये इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या इब्राहिम अकीलचा वारसदार म्हणून तबतबाईकडे सूत्रे होती. इस्रायलने हिजबुल्लाहला पुन्हा शस्त्रे जमा न करण्याचा आणि संघटनेची पुनर्बांधणी न करण्याची स्पष्ट ताकीद दिली होती. एका वर्षापूर्वी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध संपुष्टात आले होते, मात्र या ताज्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी निवेदनात म्हटले, "आम्ही उत्तर इस्रायलमधील रहिवाशांसाठी आणि इस्रायल राज्यासाठी असलेला कोणताही धोका रोखण्यासाठी कठोर कारवाई करत राहू."
पोपच्या दौऱ्यापूर्वी कारवाई
विशेष म्हणजे कॅथोलिक ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च नेते पोप लिओ १४ वे यांच्या लेबनॉन दौऱ्याच्या काही दिवस आधीच इस्रायलने ही कारवाई केली आहे. सरकारी प्रवक्त्या शोश बेडरोसियन यांनी या हल्ल्यापूर्वी अमेरिकेला माहिती देण्यात आली होती का, हे स्पष्ट केले नाही, परंतु इस्रायल स्वतंत्रपणे निर्णय घेतो, असे त्यांनी सांगितले.
लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांनी या हल्ल्याचा निषेध करत इस्रायलवर युद्धविराम कराराचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासाठी ताकद आणि गांभीर्याने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. व्यस्त हरेत हरेक परिसरात रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट उठतानाचे दृश्य दिसत होते.