"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 20:00 IST2025-12-14T19:59:07+5:302025-12-14T20:00:00+5:30
Australia Firing: इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हा यहुदांवरील क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर हनुका उत्सवादरम्यान रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. दोन बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १० ज्यू नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या उत्सवात सुमारे दोन हजार ज्यू बांधव सहभागी झाले होते. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. यानंतर आता इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हा यहुदांवरील क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले इसाक हर्जोग? -
इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या 'घृणास्पद' कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. "हनुकाची पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी एकत्र आलेल्या आमच्या ज्यू बंधू-भगिनींवरील हा क्रूर हल्ला आहे. संपूर्ण राष्ट्र पीडितांसोबत आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच या हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांसाठीही प्रार्थना करतो." याच बरोबर, ऑस्ट्रेलिया सरकारने देशात वाढत असलेल्या ज्यूविरोधी प्रतिक्रियांविरोधात तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही हर्जोग यांनी केली आहे.
त्या घोषणा आज खऱ्या ठरल्या -
परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी या हल्ल्याला 'क्रूर हत्या', असे संबोधले आहे. ते म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या ज्यूविरोधी उन्मादाचा हा परिणाम आहे. ज्यूविरोधी भडकाऊ घोषणा अनेकदा देण्यात आल्या, ज्या आज सत्य ठरल्या आहेत." एवढेच नाही तर, "ऑस्ट्रेलिया सरकारला अनेक वेळा संकेत मिळाले होते. त्यांनी भानावर यायला हवे," अशा कठोर शब्दांत सार यांनी टीका केली आहे.