Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:37 IST2025-06-16T12:35:04+5:302025-06-16T12:37:41+5:30
Israel Iran War News: हल्ल्यांचा तिसरा दिवस; यापेक्षा भयंकर हल्ल्यांची धमकी दिली.

Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
दुबई: इस्रायल-इराण संघर्ष भयंकर चिघळला असून, रविवारी सलग तिसऱ्या दिवशी या देशांनी परस्परांवर तीव्र हल्ले केले. इस्रायली हल्ल्यांत इराणमध्ये किमान ४०६ जण ठार, तर ६५४ जण जखमी झाले, असे एका मानवाधिकार संस्थेने सांगितले. इस्रायलमध्ये इराणने केलेल्या हल्ल्यात १२८ जण मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.
या तणावात इराण-अमेरिका यांच्यात ओमान येथे होणारी आण्विक मुद्द्यावरील चर्चा रद्द करण्यात आली असून, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आता इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तेहरान येथील एका तेल साठ्यात स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा अनेक किलोमीटरवरुन दिसत होत्या . तेथील ऑइल डेपो जळून खाक झाला.
असे हाल करू की... : ट्रम्प
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेचा काही संबंध नाही. अमेरिकेच्या वाटेला याल तर असे हाल करू की यापूर्वी कधीही पाहिले नसतील, अशा कडक शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
भारतीयांसाठी संदेश
इराणमधील भारतीयांनी घाबरू नये, सावधगिरी बाळगावी, असा संदेश तेथील भारतीय वकिलातीने दिला आहे. इस्रायली हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या स्थितीत वकिलातीच्या संपर्कात राहावे, असे या भारतीयांना कळविण्यात आले आहे. भारतीयांसाठी एक गूगल फॉर्म भरून व टेलिग्राम लिंकने माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.