"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:25 IST2025-10-15T17:24:54+5:302025-10-15T17:25:51+5:30
Israel Hamas War: हमासने आमचा विश्वासघात केला असून त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू, अशी धमकी इस्रायलने दिली आहे.

"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
सर्व बंदींना आणि मृतदेहांना परत आणल्याशिवाय इस्रायली सैन्य शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार इस्रायली आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एयाल झमीर यांनी व्यक्त केला. सर्व बंदींना परत मिळवणे हे इस्रायली सैन्याचे नैतिक, राष्ट्रीय आणि यहुदी कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झमीर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा हमासकडून बंदी आणि मृतदेहांच्या देवाणघेवाणीत फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. हमास अजूनही २१ मृत बंदींचे मृतदेह ताब्यात ठेवून आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी फक्त सात मृतदेह परत केले, तर सोमवारी त्यांनी २० बंदींची सुटका केली.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, बुधवारी हमासने इस्रायलला चार मृत बंदींचे मृतदेह सोपवले. मात्र, इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी एक मृतदेह इस्रायली बंदींचा नसून गाझा पट्टीतील एका पॅलेस्टिनी नागरिकाचा होता. हमासने जाणीवपूर्वक हा मृतदेह इस्रायली बंदीचा असल्याचा दावा केला. यापूर्वी, याच वर्षाच्या सुरुवातीलाही हमासने मारल्या गेलेल्या शिरी बिबास यांचा मृतदेह इस्रायलला सोपवला होता, जो नंतर पॅलेस्टिनी नागरिकाचा असल्याचे सिद्ध झाले. या 'विश्वासघाता'मुळे इस्रायलच्या राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. आयडीएफ प्रमुख एयाल झमीर यांनी स्पष्ट केले की, "राजकीय नेतृत्वासह, आम्ही सर्व करार अंमलात आणण्यात दृढ राहू. परंतु, आम्ही सर्व बंदी परत येईपर्यंत आम्ही शांत राहणार नाही."
इस्रायलचे अतिउजवे मंत्री इटामार बेन गवीर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "पुरे झाले अपमान... शेकडो ट्रकसाठी मार्ग मोकळा केल्यानंतर काही क्षणांतच, हमासने त्यांचे खरे रंग दाखवले. नाझी दहशतवादाला फक्त शस्त्रांची भाषा समजते. त्यांना थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे."