“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 09:40 IST2025-05-07T09:36:51+5:302025-05-07T09:40:07+5:30
Operation Sindoor Surgical Air Strike: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत असून, इस्रायलने भारताला पाठिंबा दिला आहे.

“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
Operation Sindoor Surgical Air Strike: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री दीडनंतर पाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारताने सीमेवरून पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्रे डागली, असे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ही क्षेपणास्त्रे पाकव्याप्त काश्मीर आणि देशाच्या पूर्व पंजाब प्रांतात डागण्यात आली. भारताच्या या एअर स्ट्राइकनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेनंतर आता इस्रायलकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करण्यात आले आहे. या एअर स्ट्राइकचे इस्रायलकडून समर्थन करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या हल्ल्यानंतर मुझफ्फराबादमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बहावलपूरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पाकने ४८ तासांसाठी सर्व हवाई वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी एक्सवर पोस्ट करत भारताला खुले समर्थन दिले आहे.
भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार
राजदूत रुवेन अझर आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे, असे अझर यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भारताने पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्या ठिकाणांहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले गेले आणि निर्देशित केले गेले. भारतीय सशस्त्र दलांनी एकूण ९ ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. आमच्या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली, त्याच्या पद्धतीत भारताने बराच संयम दाखवला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.