Israel Iran War: इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर क्षेपणास्त्र हल्ला; भारतावर काय परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 23:07 IST2026-03-18T23:06:02+5:302026-03-18T23:07:47+5:30
मध्य पूर्वेतील संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने बुधवारी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या साऊथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या नॅचरल गॅस फिल्डवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

Israel Iran War: इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर क्षेपणास्त्र हल्ला; भारतावर काय परिणाम होणार?
मध्य पूर्वेतील संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने बुधवारी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या साऊथ पार्स या जगातील सर्वात मोठ्या नॅचरल गॅस फिल्डवर क्षेपणास्त्र हल्ला केला. अमेरिका आणि इस्रायलनेइराणच्या वायू साठ्याला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत सौदी अरेबिया, कतर आणि यूएईच्या तेल व गॅस तळांना उडवून देण्याची धमकी दिली, ज्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
साऊथ पार्स आणि कतरचे नॉर्थ फिल्ड हे एकत्रितपणे जगातील सर्वात मोठे वायू क्षेत्र मानले जाते. ९७०० वर्ग किमी क्षेत्रात पसरलेल्या या क्षेत्रात १८०० ट्रिलियन क्यूबिक फूट गॅसचा साठा आहे. या एकाच क्षेत्रातून संपूर्ण जगाची १३ वर्षांची इंधनाची गरज पूर्ण होऊ शकते किंवा ३५ वर्षे वीज निर्मिती होऊ शकते. इराण दररोज ७०० दशलक्ष घनमीटर गॅसचे उत्पादन येथून करतो. यावर हल्ला होणे म्हणजे इराणची अर्थव्यवस्था कोलमडण्यासारखे आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये हल्ल्यानंतर आगीच्या अजस्र ज्वाळा आकाशात उठताना दिसत आहेत. या हल्ल्यात किती जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र इराणच्या सरकारी मीडियाने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
NEW - Fires rage at the world's largest natural gas field South Pars, Iran, struck by Israeli-American forces, multiple phases of processing capacity critically hit and taken offline. pic.twitter.com/12MjBkM89b
— Disclose.tv (@disclosetv) March 18, 2026
इराणची पलटवारची धमकी; आखाती देशांत धडकी
या हल्ल्यामुळे संतापलेल्या इराणने आता शेजारील देशांनाही इशारा दिला आहे. जर इस्रायलला मदत झाली, तर आम्ही सौदी, कतर आणि यूएईच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करू, असे इराणने म्हटले आहे. कतरने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, अशा हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारत एलपीजी आणि एलएनजीसाठी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून आहे. जर इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांच्या गॅस फिल्डवर हल्ले केले, तर गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात. युद्धाचा परिणाम थेट हिंदी महासागरातील मालवाहतुकीवर होऊ शकतो.