आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:37 IST2026-03-04T11:36:15+5:302026-03-04T11:37:32+5:30

Israel Iran War News: इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता इतका उडाला आहे की, तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. उर्मिया येथे अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांनी एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करत मदतीची आर्त हाक दिली आहे.

israel iran war: Save Us, We Are Not Safe, 110 Indian Students Stranded in Urmia Plead for Urgent Evacuation | आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक

आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा फटका तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसत आहे. इराणमधील उर्मिया शहरात अडकलेल्या सुमारे ११० भारतीय विद्यार्थ्यांनी एका व्हिडिओद्वारे भारत सरकारकडे मदतीसाठी हाक दिली. आमच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोट होत आहेत, आम्ही सुरक्षित नाही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली भीती व्यक्त केली आहे.

उर्मियामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात त्यांच्या खोलीच्या खिडकीतून धूर आणि स्फोटांचे भयानक दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खोलीपासून  किमी अंतरावर बॉम्ब पडला. नंतर हाच स्फोट १ किमी अंतरावर झाला. आता परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अवघ्या १०० मीटर अंतरावर हल्ले होत आहेत.

इराणमध्ये सध्या १० ते १५ हजार भारतीय विद्यार्थी असून ते प्रामुख्याने तेहरान, शिराझ आणि उर्मिया सारख्या शहरांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. उर्मियात अडकलेले ११० विद्यार्थी उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, मुंबई, पुणे आणि काश्मीर अशा विविध भागांतील आहेत. भारतीय दूतावास सध्या तेहरान आणि शिराझमधील विद्यार्थ्यांना कोम शहरात हलवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र सीमेजवळ असलेल्या उर्मियातील विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही दूतावासाच्या संपर्कात आहोत, पण त्यांनी आम्हाला सध्या स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. आमची विनंती आहे की, जसे सरकारने यापूर्वी आम्हाला संकटातून बाहेर काढले, तसेच आताही आमची इथून सुटका करावी."

भारतीय दूतावासाने यापूर्वीच दोनदा इराण सोडण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू असल्याने आणि त्याच वेळी विमान तिकिटांचे दर गगनाला भिडल्याने अनेक विद्यार्थी मायदेशी परतू शकले नाहीत. आता युद्ध भीषण झाल्याने विमानांची वाहतूक विस्कळीत झाली असून विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. भारतात असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्र्यांकडे कळकळीची विनंती केली आहे. युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे मुलांशी संपर्क करणे कठीण होत असून, त्यांना विशेष विमानाने लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी केली जात आहे.

Web Title : ईरान में फंसे भारतीय छात्रों ने संघर्ष के बीच बचाव की गुहार लगाई।

Web Summary : ईरान-इजरायल संघर्ष के बीच, उर्मिया में फंसे 110 भारतीय छात्र तत्काल निकासी चाहते हैं। उनके पास बमबारी से डर बैठ गया है। छात्रों ने भारत सरकार से विशेष उड़ानों के माध्यम से तत्काल बचाव की अपील की है, क्योंकि वाणिज्यिक विकल्प बाधित हैं और संचार मुश्किल है।

Web Title : Stranded Indian students in Iran plead for rescue amid conflict.

Web Summary : Amidst Iran-Israel conflict, 110 Indian students in Urmia urgently seek evacuation. Bombings near them have instilled fear. Students appeal to the Indian government for immediate rescue via special flights, as commercial options are disrupted and communication is difficult.