इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:37 IST2025-06-16T13:37:16+5:302025-06-16T13:37:58+5:30
Israel-Iran Conflict: इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान, हैफा बंदराला लक्ष्य केल्याचा आणि त्यात हे बंदर उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अदानी समुहाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती
गेल्या काही दिवसांपासून इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. या संघर्षात दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रांसारख्या घातक अस्त्रांनी प्रहार करत असल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत आहे. दरम्यान, इराणने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान, हैफा बंदराला लक्ष्य केल्याचा आणि त्यात हे बंदर उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अदानी समुहाकडून स्पष्टीकरण आलं आहे. इराणच्या हल्ल्यात हैफा बंदराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. हैफा बंदरामध्ये नियमितपणे काम सुरू आहे, असे अदानी समुहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंह यांनी सांगितले.
इराण आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या हल्ल्यात अदानी समुहाकडून चालवण्यात येणाऱ्या हैफा बंदरावरील कार्गो फॅसिलिटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच हैफा बंदराच्या झालेल्या नुकसानीचे काही फोटोही शेअर करण्यात आले होते. त्यानंतर अदानी समुहाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हैफा बंदर उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
False. https://t.co/ZuvzY5Uvj5
— Jugeshinder Robbie Singh (@jugeshinder) June 15, 2025
अदानी समुहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंह यांनी याबाबत करण्यात आलेल्या पोस्टला शेअर करताना स्पष्ट केले की, इराणकडून करण्यात आलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही अदानी समुहाचं हैफा बंदर पूर्णपणे सुरू आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात बंदराची कुठलीही हानी झालेली नाही. तसेच हैफा बंदर म्हणून सोशल मीडियावर जे फोटो शेअर केले जात आहेत. ते तेहरानमधील तेलाच्या डेपोचे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.