इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले; हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 21:16 IST2025-07-06T21:15:15+5:302025-07-06T21:16:30+5:30
Israel-Hamas: या हल्ल्यामुळे इस्रायल आणि हमासमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

File Photo
Israel-Hamas: इस्रायल आणि हमासमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. इस्रायली सैन्याने (IDF) हमासच्या सैनिकांवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात हमास नौदलाचा कमांडर रमझी रमजान अब्द अली सालेह मारला गेला. इस्रायली सैन्याच्या मते, सालेह हा हमासमधील एक महत्त्वाचा व्यक्ती होता. गाझामध्ये तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांविरुद्ध समुद्री हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात याची प्रमुख भूमिका होती.
आयडीएफने या हल्ल्यात आणखी दोन हमास सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यामध्ये हमासच्या मोर्टार शेल युनिटचा प्रमुख हिशाम आयमान अतिया मन्सूर याचा समावेश आहे. तर, हमासच्या त्याच मोर्टार युनिटशी संबंधित नसीम मोहम्मद सुलेमान अबू सबाह याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने या कारवाईचे वर्णन गाझामध्ये सक्रिय दहशतवाद्यांच्या क्षमता कमकुवत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे. या कारवाईचे उद्दिष्ट हमासची लष्करी रचना तोडणे आणि इस्रायली सैनिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.
गाझा सिटी कॅफेवर हल्ला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयडीएफने गाझा सिटीमधील एका कॅफेवर हल्ला झाल्याची पुष्टी केली, ज्यामध्ये हमासशी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनुसार २४ जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या कारवाईत हमासचे अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत.
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
हल्ल्याच्या वेळी सालेह एक बैठक घेत होता
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, सालेह हा हमासच्या नौदलाचा मुख्य चेहरा होता. अलिकडच्या काळात तो इस्रायली सैनिकांविरुद्ध समुद्री हल्ल्यांची योजना आखत होता. गाझा सिटीमधील एका इमारतीत त्याला लक्ष्य करण्यात आले. जिथे तो इतर हमास सैनिकांसोबत बैठक घेत होता. हा अचूक हल्ला इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानाने केला होता, जो नौदल, लष्करी गुप्तचर संचालनालय आणि शिन बेटकडून मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आला.