“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 18:51 IST2023-10-07T18:50:30+5:302023-10-07T18:51:27+5:30
हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला असून, भारताने इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे.

“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार
Israel Hamas Palestine Conflict: हमासने इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू केले. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. यानंतर इस्रायलने जशास तसे उत्तर देण्यासाठी हमासविरोधात 'ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स' सुरु केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला असून, या समर्थनाबाबत इस्रायलने भारताचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही युद्धात उतरलो आहोत. हे कोणतेही ऑपरेशन नाही. हमासने इस्रायलचे नागरिक आणि देशाविरोधात हल्ला केला आहे. सर्वात आधी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वस्त्या संपविण्याचे आदेश दिले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविण्यास सांगितले आहे. आता त्यांना किंमत चुकवावी लागणार आहे, असा थेट इशारा नेतन्याहू यांनी दिला.
आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत
इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आले आहे. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यानंतर इस्रायलचे अधिकारी कोबी शोशानी म्हणाले की, आम्ही बऱ्यापैकी मजबूत आहोत. आम्हाला मदतीची गरज नाही. पण आम्हाला समजून घेण्याची आणि तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. चांगली माणसे आणि जगातील चांगले देश आणि भारत त्यापैकी एक आहे ज्याच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. हे आमच्यासाठी खुप महत्त्वाचे आहे, असे सांगत भारताच्या पाठिंब्याबाबत आभार मानले.
दरम्यान, हमासच्या हल्लानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. शनिवारी सकाळी पॅलेस्टिनी शस्त्र समूह हमासने गाझा पट्टीतून जोरदार रॉकेट हल्ले केले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे.